सुरेश धस यांच्याकडून जाणीवपूर्वक चारित्र्य हननाचा प्रयत्न, जाहीर माफी मागावी - प्राजक्ता माळी
मुंबई, 28 डिसेंबर (हिं.स.) - गेल्या दीड महिन्यापासून मी सगळा प्रकार पाहतेय. या कालावधीत मी ट्रोलिंगला, आक्षेपार्ह कमेंट्सचा सामना केला. मी शांत राहिले. पण शांतता म्हणजे मूकसंमती नव्हे. माझी शांतता ही हतबलतेमधून आली आहे. एक व्यक्ती माझ्याबद्दल काहीतरी
प्राजक्ता माळी


मुंबई, 28 डिसेंबर (हिं.स.) - गेल्या दीड महिन्यापासून मी सगळा प्रकार पाहतेय. या कालावधीत मी ट्रोलिंगला, आक्षेपार्ह कमेंट्सचा सामना केला. मी शांत राहिले. पण शांतता म्हणजे मूकसंमती नव्हे. माझी शांतता ही हतबलतेमधून आली आहे. एक व्यक्ती माझ्याबद्दल काहीतरी बरळते. त्याचे हजारो व्हिडीओ तयार होतात. एक बोलल्यावर दुसरा बोलतो. मग पुन्हा पहिला त्याला उत्तर देतो. ही चिखलफेक सुरु आहे. त्यातून महिलांची अब्रू निघते. राजकारणासाठी अशा प्रकारे महिलांची बदनामी कशासाठी करता?' असा प्रश्न अभिनेत्री प्राजक्ता माळीनं उपस्थित केला. सुरेश धसांच्या एका निराधार विधानामुळे प्रचंड मनस्ताप सहन करावा लागल्याचं म्हणत त्यांनी जाहीर माफी मागायला हवी, अशी ठाम भूमिका प्राजक्ता माळीनं घेतली आहे.

प्राजक्ता माळी हिच्याबाबत बीडचे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या विधानामुळे मोठी चर्चा सुरू झाली आहे. आमदार सुरेश धस यांनी बीडमधील इव्हेंट पॉलिटिक्स असं म्हणत धनंजय मुंडेंवर टीका केली. मात्र, त्यावेळी त्यांनी अभिनेत्री प्राजक्ता माळीचं नाव घेतल्यामुळे त्यावरून उलट-सुलट चर्चा सुरू झाली. या सगळ्या प्रकरणावर आज मुंबईत प्राजक्ता माळीनं पत्रकार परिषद घेऊन आपली सविस्तर बाजू मांडली. आमदार धस यांचे वक्तव्य जाणीवपूर्वक चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न आहे, त्यांच्या वक्तव्यातील कुत्सितपणा दिसून येतो. त्यामुळे, त्यांनी जाहीरपणे माफी मागावी, अशी मागणी प्राजक्ता माळीने केली.

कलाकार म्हणून वेगवेगळ्या शहरांत जाणं, प्रेक्षकांचं मनोरंजन करणं हे कलाकारांचं काम आहे. परळीच नाही, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन मी काम केलं आहे. यापुढेही काम करत राहणार. याआधीही अनेक राजकीय नेत्यांबरोबर, मान्यवरांबरोबर फोटो आहेत. मग त्या फोटोचा संदर्भ घेऊन तुम्ही कुणाहीबरोबर असंच नाव जोडणार का? हे एक महिला कलाकार म्हणून मला अतिशय निंदनीय वाटतं. महाराष्ट्रातल्या राजकारण्यांना हे कृत्य शोभत नाही. ते बोलले ते इतकं कुत्सित आहे. तुम्ही फक्त महिला कलाकारांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवत नाही आहात. महिलांच्या कर्तृत्वावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहात. कुठल्या राजकारण्यांच्या कुबड्यांशिवाय एखादी महिला स्वकर्तृत्वावर यशस्वी होऊ शकत नाही का? अशी टिप्पणी करून तुम्ही स्वत:ची मानसिकता दाखवत आहात, अशा शब्दांत प्राजक्ता माळीनं आपला संताप व्यक्त केला.

फिल्म इंडस्ट्रीतल्या महिलांना फार सॉफ्ट टार्गेट केलं जातं. कुणीही यावं आणि नावं घेऊन जावं. तुम्ही तुमच्यातल्या राजकारणासाठी फिल्म क्षेत्रातल्या महिलांच्या नावांचा गैरवापर करणं बंद करावं अशी मी त्यांना विनंती करते. प्रसारमाध्यमांसमोर हशा पिकवण्यासाठी त्यांनी त्या टिप्पणीचा वापर केला. प्रसारमाध्यमांसमोर कसं बोलावं याचं त्यांना भान नाहीये. मी त्यांना विनंती करते की त्यांनी तितक्याच विनम्रतेनं जाहीरपणे माझी मागावी. फक्त माझीच नाही, ज्या महिलांचा त्यांनी चुकीचा उल्लेख केलाय, त्यांचीही त्यांनी माफी करावी. कोणत्याही राजकीय गोष्टीसाठी फिल्म इंडस्ट्रीतल्या महिलांच्या नावाचा गैरवापर होता कामा नये. मी आज महिला आयोगाकडे तक्रार केलेली आहे. मी त्यांनाही विनंती केली आहे की तुम्ही यावर कायद्याच्या चौकटीत राहून कारवाई करावी. मीही कायदेशीर कारवाई करत राहीन, असं प्राजक्ता माळी म्हणाली.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande