राज्यघटना आपल्यासाठी मार्गदर्शक प्रकाश-दीपस्तंभ - पंतप्रधान
नवी दिल्ली, 29 डिसेंबर (हिं.स.) - येत्या 26 जानेवारी रोजी आपली राज्यघटना लागू होऊन 75 वर्षे पूर्ण होत आहेत. आपल्या सर्वांसाठी ही खूप अभिमानाची आणि गौरवास्पद बाब आहे. आपल्या राज्यघटनाकारांनी आपल्या हाती सुपूर्द केलेली राज्यघटना, काळाच्या प्रत्येक नि
पंतप्रधान मोदी


नवी दिल्ली, 29 डिसेंबर (हिं.स.) - येत्या 26 जानेवारी रोजी आपली राज्यघटना लागू होऊन 75 वर्षे पूर्ण होत आहेत. आपल्या सर्वांसाठी ही खूप अभिमानाची आणि गौरवास्पद बाब आहे. आपल्या राज्यघटनाकारांनी आपल्या हाती सुपूर्द केलेली राज्यघटना, काळाच्या प्रत्येक निकषावर सिद्ध झाली आहे. राज्यघटना आपल्यासाठी मार्गदर्शक प्रकाश-दीपस्तंभ आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. ‘मन की बात’ (117 वा भाग) कार्यक्रमातून त्यांनी देशवासियांशी संवाद साधला.

ते पुढे म्हणाले, भारताच्या राज्यघटनेमुळेच आज मी इथे आहे, तुमच्याशी बोलू शकत आहे. यावर्षी 26 नोव्हेंबरला संविधान दिनापासून वर्षभर चालणाऱ्या अनेक उपक्रमांना सुरुवात झाली आहे. देशातील नागरिकांना राज्यघटनेच्या वारशाशी जोडण्यासाठी constition75.com नावाचे खास संकेतस्थळही तयार करण्यात आले आहे. यामध्ये तुम्ही राज्यघटनेची प्रास्ताविका वाचून तुमची ध्वनीचित्रफीतही टाकू शकता. तुम्ही राज्यघटना वेगवेगळ्या भाषांमध्ये वाचू शकता… राज्यघटनेबद्दल प्रश्नही विचारू शकता. ‘मन की बात’चे श्रोते, शाळेत शिकणारी मुले, महाविद्यालयात जाणारे तरुण-तरुणी यांना मी विनंती करतो की त्यांनी या संकेतस्थळाला नक्कीच भेट द्यावी आणि त्याचा एक भाग व्हावे.

पुढील महिन्याच्या 13 तारखेपासून प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळाही सुरू होणार आहे. संगमाच्या काठावर सध्या जोरदार तयारी सुरू आहे. मला आठवतं, काही दिवसांपूर्वी मी प्रयागराजला गेलो होतो, तेव्हा हेलिकॉप्टरमधून कुंभमेळ्याचा संपूर्ण परिसर बघून खूप आनंद झाला होता. इतका महाकाय! इतका सुंदर! एवढा भव्यपणा ! महाकुंभ मेळ्याचे वैशिष्ट्य केवळ त्याच्या विशालतेतच नाही. कुंभाचे वैशिष्ट्य त्यातील वैविध्यात देखील आहे. या कार्यक्रमात कोट्यवधी लोक एकावेळी एकत्र येतात. लाखो संत, हजारो परंपरा, शेकडो पंथ, अनेक आखाडे… प्रत्येकजण या कार्यक्रमाचा एक भाग बनतो. कुठेही भेदभाव दिसून येत नाही, कोणी मोठा नाही, कोणी लहान नाही. विविधतेतील एकतेचे असे दृश्य जगात कुठेही दिसणार नाही. म्हणूनच आपला कुंभमेळा हा एकतेचा महाकुंभही आहे. यावेळच्या महाकुंभातूनही एकतेच्या महाकुंभाचा मंत्र दृढ होणार आहे. मी तुम्हा सर्वांना सांगेन की, जेव्हा आपण कुंभमेळ्याला जाल, तेव्हा एकतेचा हा संकल्प घेऊन परत या. आपण, समाजातील फूट आणि द्वेषाची भावना नष्ट करण्याची शपथही घेतली पाहिजे.

यावेळी देशभरातील आणि जगभरातील भाविक प्रयागराजमध्ये डिजिटल महाकुंभाचे साक्षीदार होणार आहेत. डिजिटल मार्गदर्शनाच्या मदतीने तुम्हाला विविध घाट, मंदिरे, साधूंचे आखाडे यांच्यापर्यंत पोहोचण्याचा रस्ता सापडेल. ही मार्गदर्शक प्रणाली तुम्हाला वाहनतळा पर्यंत पोहोचण्यासही मदत करेल. कुंभमेळ्याच्या कार्यक्रमात प्रथमच एआय चॅटबॉट चा वापर केला जाणार आहे. AI चॅटबॉटच्या माध्यमातून कुंभमेळ्याशी संबंधित प्रत्येक प्रकारची माहिती 11 भारतीय भाषांमध्ये मिळू शकते. मजकूर टाइप करून किंवा बोलून कोणीही या चॅटबॉटवरून कोणत्याही प्रकारची मदत मागू शकतो. कुंभमेळ्याचा संपूर्ण परिसर कृत्रिम बुद्धिमत्ता संचालित कॅमेऱ्यांनी टिपला जात आहे. कुंभकाळात कुणी आपल्या व्यक्तीपासून हरवले… ताटातूट झाली… तर त्यांना शोधण्यातही हे कॅमेरे मदत करतील. भाविकांना, डिजीटल लॉस्ट अँड फाउंड सेंटर, या हरवले आणि सापडले केंद्राची सुविधाही मिळणार आहे. तसेच भाविकांना, सरकारमान्य टूर पॅकेज, निवास आणि होमस्टे म्हणजे स्थानिकांच्या घरात पर्यटकांची राहण्याची सुविधा याबाबतची माहिती मोबाईलवर दिली जाईल. तुम्हीही महाकुंभमेळ्याला गेलात तर या सुविधांचा लाभ घ्या आणि हो, #EktaKaMahaKumbh या हॅशटॅगसह तुमचा सेल्फी नक्कीच टाका.

'मन की बात' अर्थात MKB मध्ये आता आपण KTB बद्दल बोलणार आहोत. ज्येष्ठांच्या पिढीतील अनेकांना KTB बद्दल माहीत नसेल. पण जरा मुलांना विचारा, त्यांच्यात KTB खूप प्रसिद्ध आहे. KTB म्हणजे क्रृश, तृश आणि बाल्टीबॉय. तुम्हाला कदाचित मुलांच्या आवडत्या ॲनिमेशन मालिकेबद्दल माहिती असेल आणि तिचे नाव आहे ‘KTB – भारत हैं हम’ ….आणि आता या मालिकेचा दुसरा हंगामही आला आहे. ही तीन ॲनिमेशन पात्रे आपल्याला भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील त्या नायक आणि नायिकांबद्दल सांगतात ज्यांची फारशी चर्चा होत नाही. नुकताच या मालिकेचा हंगाम-2, गोवा इथे नुकत्याच झालेल्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव-इफ्फीत अतिशय खास पद्धतीने सुरू करण्यात आला. सर्वात महत्वाची गोष्ट अशी की ही मालिका फक्त अनेक भारतीय भाषांमध्येच नाही तर परदेशी भाषांमध्येही प्रसारित केली जाते. ही मालिका दूरदर्शन तसेच इतर OTT मंचांवर पाहता येईल.

आपल्या ॲनिमेशनपटांची, नियमित चित्रपटांची आणि टीव्ही मालिकांची लोकप्रियता हेच दाखवते की भारताच्या सर्जनशील उद्योगात केवढी क्षमता आहे. हा उद्योग देशाच्या प्रगतीत मोठे योगदान तर देत आहेच, पण आपल्या अर्थव्यवस्थेलाही नवी उंची गाठून देत आहे. आपल्या देशाचा चित्रपट आणि मनोरंजन उद्योग खूप मोठा आहे. देशातील कितीतरी भाषांमध्ये चित्रपट बनवले जातात आणि सर्जनशील आशयाची निर्मिती होते. मी आपल्या चित्रपट आणि मनोरंजन उद्योगाचेही अभिनंदन करतो… कारण त्यांनी ‘एक भारत – श्रेष्ठ भारत’ ही भावना मजबूत केली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande