रत्नागिरी, 28 डिसेंबर, (हिं. स.) : उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अधिपत्याखालील शासकीय व शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयामध्ये १ ते १५ जानेवारी या कालावधीत “वाचन संकल्प महाराष्ट्राचा” हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.
या उपक्रमाचा प्रारंभ कुमार भाऊ येथील जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाद्वारे ३० डिसेंबर २०२४ रोजी ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन करून करण्यात येणार आहे.
वाचन संस्कृतीच्या विकासाने तरुणांच्या व्यक्तिमत्त्वाचे पोषण होण्यास तसेच सामाजिक प्रबोधन होण्यास मदत होते; परंतु अलीकडच्या काळात देशाचा तरुण वाचन संस्कृतीपासून दुरावत चाललेला असल्याचे आढळून येत आहे. त्यामुळे तरुण पिढीला प्रत्यक्ष ग्रंथ वाचनाकडे आकर्षित करण्याची आवश्यकता आहे. जिल्ह्यातील वाचक व विद्यार्थी यांना पुन्हा पुस्तकांकडे आकृष्ट करण्यासाठी मोठ्या प्रमाणात ग्रंथ प्रदर्शन, सामूहिक वाचन, वाचनकौशल्य कार्यशाळा आदी कार्यक्रमांचे आयोजन शासकीय व सार्वजनिक ग्रंथालयाकडून १ ते १५ जानेवारी या कालावधीत करण्यात येणार आहे.
या उपक्रमामध्ये स्थानिक वाचकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग व्हावे, असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी शशांक नाईक यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / बाळकृष्ण कोनकर