अहमदाबाद, 01 जानेवारी (हिं.स.) : गुजरातच्या कच्छ जिल्ह्यात आज, बुधवारी सकाळी 10.24 मिनिटांनी 3.2 रिश्टर स्केलचा भूकंप झाला. या भूकंपामुळे कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झाल्याचे वृत्त नाही. गांधीनगरच्या इन्स्टिट्यूट ऑफ अर्थक्वेक रिसर्च (आयएसआर) अनुसार हा भूकंप सकाळी 10.24 वाजता झाला. त्याचे केंद्र भचौच्या उत्तर-ईशान्येस 23 किलोमीटर अंतरावर होते.
गेल्या महिन्यात, प्रदेशात 3 पेक्षा जास्त तीव्रतेच्या 4 भूकंपाच्या हालचालींची नोंद करण्यात आली होती, ज्यामध्ये 3 दिवसांपूर्वी 3.2 तीव्रतेचा भूकंप होता, ज्याचा केंद्रबिंदू भचौजवळही होता. जिल्ह्यात 23 डिसेंबरला 3.7 रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता. तर 7 डिसेंबरला 3.2 रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता. तसेच 18 नोव्हेंबर रोजी कच्छमध्ये रिश्टर स्केलवर 4 तीव्रतेचा भूकंप झाला होता. यापूर्वी 15 नोव्हेंबर रोजी उत्तर गुजरातमधील पाटणमध्ये 4.2 तीव्रतेचा भूकंप झाला होता. गुजरात भूकंपाच्या दृष्टीने अतिसंवेदनशील प्रदेशात मोडते. गुजरात राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या आकडेवारीनुसार, गुजरातमध्ये गेल्या 200 वर्षांत नऊ मोठे भूकंप झाले.
गुजरात राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणनुसार, 26 जानेवारी 2001 चा कच्छचा भूकंप हा गेल्या 2 शतकांमध्ये भारतात झालेला तिसरा सर्वात मोठा आणि दुसरा सर्वात विनाशकारी भूकंप होता. भूकंपात जिल्ह्यातील अनेक शहरे आणि गावे जवळजवळ पूर्णपणे उद्ध्वस्त झाली होती, ज्यामुळे सुमारे 13,800 लोकांचा मृत्यू होऊन 1.67 लाख लोक जखमी झाले होते.
------------------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी