रामटेक : काँग्रेस उमेदवाराचे जात वैधता प्रमाणपत्र रद्द
नागपूर, 28 मार्च (हिं.स.) : नागपूर जिल्ह्यातील रामटेक लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या (मविआ)
रश्मी बर्वे


नागपूर, 28 मार्च (हिं.स.) : नागपूर जिल्ह्यातील रामटेक लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या (मविआ) उमेदवार रश्मी बर्वे यांचे जात वैधता प्रमाणपत्र रद्द झालेय. ऐन निवडणुकीच्या हंगामात हा निर्णय समोर आल्याने आता बर्वे यांच्यासह काँग्रेस आणि महाविकास आघाडीची मोठी अडचण झाली आहे.

रश्मी बर्वे या काँग्रेसच्या (मविआ) रामटेक लोकसभा मतदारसंघातील अधिकृत उमेदवार आहेत. बर्वे यांच्या उमेदवारीची घोषणा झाल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी एकच जल्लोष केला होता. मात्र ही उमेदवारी जाहीर झाल्यापासून त्यांच्या जात वैधता प्रमाणपत्राचाही मुद्दा समोर आला. जात वैधता प्रमाणपत्र मिळवताना कायदेशीर प्रक्रिया पार पडण्यात आलेली नाही, असा दावा करण्यात आला होता. सुनील साळवे नामक व्यक्तीने याबाबतची तक्रार दिली होती. या तक्रारीनंतर सामाजिक न्याय विभागाने जात पडताळणी समितीला योग्य ती कारवाई करण्याचा आदेश दिला होता. सामाजिक न्याय विभागाच्या आदेशानंतर जात पडताळणी समितीने बर्वे यांना नोटीस जारी केली होती. याच नोटिशीला बर्वे यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. केवळ राजकीय सुडभावनेतून माझ्यावर अशा प्रकारचे आरोप करण्यात येत आहेत, असा दावा रश्मी बर्वे यांनी आपल्या याचिकेत केला होता. त्यानंतर आता बर्वे यांचे जात वैधता प्रमाणपत्र रद्द करण्याचा निर्णय पडताळणी समितीने दिला आहे. या एका निर्णयामुळे बर्वे यांच्यापुढे मोठा पेच निर्माण झाला आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 27 मार्च होती. त्यामुळे बर्वे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. हा अर्ज दाखल करताना त्यांनी रामटेकमध्ये मोठे शक्तीप्रदर्शन केले. मात्र अर्ज दाखल केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी जात वैधता पडताळणी समितीने बर्वे यांचे जात वैधता प्रमाणपत्र रद्द ठरवले आहे. त्यामुळे काँग्रेसपुढे मोठा पेच निर्माण झाला आहे. या निर्णयामुळे बर्वे यांचा उमेदवारी अर्ज रद्दबातल ठरण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास रामटेक या मतदारसंघातून महाविकास आघाडीचा उमेदवार बाद ठरू शकतो.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande