तामिळनाडू : तिकीट नाकारल्याने खासदाराची आत्महत्या
एमडीएमकेच्या खा. गणेशमूर्तींनी घेतला टोकाचा निर्णय चेन्नई, 28 मार्च (हिं.स.) : तामीळनाडू येथील एमडी
ए गणेश मूर्ती


एमडीएमकेच्या खा. गणेशमूर्तींनी घेतला टोकाचा निर्णय

चेन्नई, 28 मार्च (हिं.स.) : तामीळनाडू येथील एमडीएमके (वायको) पक्षाचे खासदार ए गणेश मूर्ती यांनी तिकीट न मिळाल्याने विष प्रशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. खा. ए गणेश मूर्ती यांनी रविवारी 24 मार्च रोजी विष प्राशन केले होते. त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू असताना आज, गुरुवारी त्यांची प्राणज्योत मालवली. मृत्यूसमयी ते 76 वर्षांचे होते.

दिवंगत ए. गणेशमूर्ती हे एमडीएमकेचे (वायको पक्ष) तामिळनाडूच्या इरोड मतदारसंघातील खासदार होते. पक्षाने त्यांना उमेदवारी नाकारल्याने ते नाराज होते. यामुळे नैराश्यात त्यांनी रविवारी किटकनाशक पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. ही घटना लक्षात येताच त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना तातडीने दवाखाण्यात भरती केले होते. इरोड येथे प्रथमोपचारानंतर त्यांना कोईम्बटूरच्या रुग्णालयात हलवण्यात आले. गणेशमूर्ती अत्यवस्थ असल्यामुळे त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. मात्र, आज गुरुवारी पहाटे 5 वाजता उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. गणेशमूर्ती 2019 मध्ये डीएमकेच्या उगवत्या सूर्य निवडणूक चिन्हावर खासदार म्हणून निवडून आले होते. त्यांनी यापूर्वी 1998 मध्ये पलानी आणि 2009 मध्ये इरोड मतदारसंघातून लोकसभा निवडणूक जिंकली होती.

मारुमलार्ची द्रविड मुनेत्र कळघम (एमडीएमके) पक्षाने यंदा सत्ताधारी द्रविड मुनेत्र कळघम (डीएमके) सोबत युती केली आहे. दोन्ही पक्षांनी अलीकडेच एमडीएमकेचे सरचिटणीस दुराई वायको यांचा मुलगा दुराई वायको यांना इरोडमधून उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला. पक्षाच्या कोअर टीमने बराच विचारविनिमय केल्यानंतर दुराई यांना लोकसभा निवडणुकीत उतरवण्याचा निर्णय घेतल्याचे वायको यांनी रविवारी सांगितले होते. पक्षाने तिकीट कापल्यामुळे ए गणेशमूर्ती यांनी रविवारी विष प्राशन केले. या प्रकरणी इरोड पोलिसांनी यापूर्वीच आत्महत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. रुग्णालय प्रशासनाने मृतदेह पोलिसांच्या ताब्यात दिला आहे. पोलिसांनी मृतदेह तपासणीसाठी इन्स्टिट्यूट ऑफ रोड ट्रान्सपोर्ट (आयआरटी) मेडिकल कॉलेज रुग्णालयात पाठवला. पक्षाच्या सूत्रांनी सांगितले की, शवविच्छेदनानंतर मृतदेह येथून 15 किमी अंतरावर असलेल्या कुमारवलसू गावात नेण्यात येणार असून या ठिकाणी त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande