शिवजयंती - राष्ट्रीय सण!
शिवरायांचे जीवन अखिल ब्रह्मांडाला अभिमान वाटावा असे आहे. शिवरायांची लढाऊ वृत्ती ही त्यांच्या काळातल्
शिवाजी महाराज 


शिवरायांचे जीवन अखिल ब्रह्मांडाला अभिमान वाटावा असे आहे. शिवरायांची लढाऊ वृत्ती ही त्यांच्या काळातल्या योद्ध्यांना नव्हे तर या क्षणापर्यंतच्या अनेक योद्ध्यांना राजकीय पुढार्यांना, सेनानींना, देशभक्तांना स्फूर्ती देणारी आहे. जगातल्या अनेक सेनानायकांना शिवरायांच्या लढाऊ वृत्तीने आकर्षित केले आहे. आज ३९४ वर्षे त्यांच्या जन्माला पूर्ण झाली तरीही ही त्यांची आरती आपण गातो, त्यांचे पोवाडे आपण गातो आणि त्यांची जयंती ही आपण आनंदाने आणि अभिमानाने साजरी करतो.

स्वातंत्र्यवीर सावरकरांना शिवरायांच्या कार्याने प्रेरणा दिली आणि त्यांनी शिवरायांची आरती गायली. लोकमान्य टिळक हे नरकेसरी म्हणून ओळखले जातात. शिवराय हे त्यांना प्राणा इतकेच प्रिय होते. म्हणूनच त्यांनी पारतंत्र्याच्या अंधारात शिवजयंती उत्सव साजरा करण्याचा घाट घातला. रवींद्रनाथ ठाकूर या आधुनिक काळातल्या ऋषीने बंगाली साहित्यामध्ये शिवरायांना अमर केले. योगी अरविंदांना शिवरायांनी मध्ये जगदंबेचे तेज आढळले. सुभाषबाबूंना शिवरायांच्या इतिहासाने मनोबल दिले. शिवरायांच्या या क्षात्रतेजामुळेच महाराष्ट्र हा हिंदुस्थानचा खड्गहस्त झाला पाहिजे असे स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणतात.

मोगलांच्या विरोधात तीनशे वर्षे रजपुत लढले. दुर्दैवाने त्यांना यश प्राप्त झाले नाही. शिवरायांनी मात्र पराभवाची परंपरा नष्ट केली आणि विजयाची परंपरा प्रस्थापित केली. ध्येयवाद, राष्ट्रप्रेम ,राष्ट्रनिष्ठा, जिद्द, युद्धकौशल्य या बळावर बलाढ्य शत्रूंनाही परास्त करता येते. हे शिवरायांनी आपल्या कृतीने सिद्ध केले.

निश्चयाचा महामेरू असलेला हा महान सेनानी प्रजेच्या, मावळ्यांच्या हिताची काळजी घेणारा होता. आपल्या मायभूमीला परकीय आक्रमकांच्या जाचातून मुक्त करून सुरक्षित ठेवणारा जाणताराजा ठरला.

मातृभाषेला प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. मातृभाषेला तिचे वैभव प्राप्त करून देण्यासाठी तिच्यात घुसलेले परकीय शब्द काढून टाकले आणि ती शुद्ध केली. त्यासाठी व्यावहारिक शब्दकोश सिद्ध केला.

गोरगरिबांना सुखात समाधान जगता यावे असे असे वातावरण स्वराज्यात निर्माण केले. न्यायाचे आणि नैतिकतेचे दर्शन आपल्या बांधवांना होईल अशी व्यवस्था स्वराज्यात निर्माण करणारा नीतिवान राजा म्हणजे छत्रपती शिवाजीमहाराज !

या वीर शिवबांनी आपल्या झोपलेल्या बांधवांना जागे केले. त्यांना राष्ट्र कार्य करण्याची प्रेरणा दिली. त्यांच्या हातात भगवा ध्वज दिला. अराजकाच्या पार्श्वभूमीवर राम राज्याची निर्मिती करण्याचे ध्येय त्यांच्या समोर ठेवले.

परकीय शत्रू बरोबर त्यांना स्वकीयांच्या विरोधाला सुद्धा तोंड द्यावे लागले. हिंदवी स्वराज्याची स्थापना ही त्यांनी ईश्वराची इच्छा मानली. ईश्वरी इच्छेच्या कार्यात येणाऱ्या सर्व अडचणींना कठोरपणे त्यांनी ठेचून टाकले. त्यांनी मद्याला, विलासी वृत्तीला, अमानवीय कृत्यांना प्राणपणाने विरोध केला. शिवरायांनी स्वतःला राज्याभिषेक करवून घेतला पण स्वतःच्या गरजा मर्यादित ठेवल्या. स्वराज्याची गरिबी नष्ट करण्यासाठी ते स्वतः गरीब राहिले. शेतकऱ्यांना सर्व प्रकारचे सहकार्य केले. त्यांच्यावर आत्महत्या करण्याचा प्रसंग येणार नाही याची काळजी घेतली. स्वराज्यातल्या संपूर्ण जनतेला अन्नधान्याचा पुरवठा करणारा शेतकरी उपासमारीने मरणार नाही यासाठी ते दक्ष राहिले.

शिवराय समर्थ सेनानी होते. तत्पर प्रशासक होते. स्वतः नियमांचे पालन करणारे होते. स्वराज्यावरचा जनतेचा विश्वास उडेल असे वर्तन त्यांनी स्वतः केले नाही आणि आपल्या सहकाऱ्यांनी असे वर्तन करू नये अशी शिकवण दिली. सर्व सरकारी सेवेत असलेल्या लोकांना निर्बंधांचे काटेकोरपणे पालन करण्याची शिस्त लावली. राजकारणाला धर्मकारणाची बैठक मिळवून देणारा हा यवनारी रचनात्मक प्रतिभेचा महामेरू होता.

जगात अन्याय घडतच असतो. न्याय मिळवावा लागतो. राजदंडा वाचून न्याय मिळत नाही. तो राजदंड मिळवायचा तर न्यायासनामागे सिंहासन हवे. सिंहासना खेरीज न्यायदान करता येत नाही. त्या सिंहासनावर मात्र स्वकीय राजा विराजमान झाला पाहिजे. जो आपल्या मातृभूमीचे आणि देश बांधवांचे हित साधण्यासाठी तत्पर असेल.

राजगादीवर विराजमान होणारा राजा संन्यस्त वृत्तीचाच हवा. त्याला कोणत्याही प्रकारची आसक्ती असता कामा नये. असा उपभोगशून्य स्वामीच स्वराज्याचा खरा धनी असतो. शिवराय हे उपभोगशून्य स्वामी होते. त्यांनी आदर्श समाज व्यवस्था निर्माण केली. त्यांच्या चारित्र्याला साधुत्वाचा सुगंध होता. त्यांचे संपूर्ण जीवन निकोप आणि निरामय होते. म्हणून समर्थांनी पुण्यशील, विचारशील, श्रीमंत योगी या उपाध्या शिवरायांना ज्या दिल्या आहेत त्या त्यांना शोभून दिसतात.

प्रयत्नवादी राज्यकर्ता हा कधीही प्रवाहपतित होत नाही रयतेला खुश करण्यासाठी आश्वासनांचा पाऊस पाडण्याची त्याला आवश्यकता वाटत नाही. धगधगता ध्येयवाद उरात बाळगून काम करणारा विद्वान राजा अभावानेच आढळतो. शिवराय हे असे होते. विद्वानांचा आदर करताना सर्वसामान्य जनतेला अंतर दिले नाही. भूमीवरच्या गड-किल्ल्यांना त्यांनी महत्व दिले त्यांची काळजी घेतली त्याच वेळी नरदुर्ग ही सांभाळले. निर्भयता आणि तत्त्वनिष्ठ माणसांची परंपरा निर्माण केली. म्हणून त्यांच्यानंतर औरंगजेबाला ही आपल्या बलाढ्य सामर्थ्यशाली सैन्यबळावर स्वराज्याची एक चौरस मिलिमीटर भूमिही जिंकता आली नाही.

शिवराय संपूर्ण देशासाठी लढले. सिंधू नदीच्या उगमापासून ते कावेरीच्या संगमापर्यंत हिंदवी स्वराज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा असे शिवराय म्हणत असत.

शिवरायांनी प्रत्येक मावळ्याच्या अंत:करणात राष्ट्रनिष्ठा चेतवली होती. त्यामुळेच प्रत्येक मावळ्याने त्याच्यावर सुपूर्द केलेले दायित्व तितक्याच निष्ठेने आणि डोळ्यात तेल घालून निभावले.

अफजलखान वधाच्या वेळी शिवरायांना मारण्यासाठी सय्यद बंडा पुढे सरसावला त्यावेळी क्षणाचाही विलंब न लावता जिवा महाला पुढे येऊन त्याने सय्यद बंडाचा शिवरायांवर वार करण्यासाठी उचललेला हात हवेतल्या हवेत खांद्यापासून तोडून टाकला.

शिवरायांनी अफझलखानाचा कोथळा बाहेर काढला होता. खानाला घेऊन जाण्यासाठी खानाच्या भोयांनी पालखी खानाजवळ आणली. खानाला पालखीत घालून अत्यंत त्वरेने ते पळू लागले. शिवरायांचा अंगरक्षक संभाजी कावजी याचे बारीक लक्ष होतेच. त्याने तात्काळ भोयांवर चाल केली आणि आपल्या तलवारीच्या घावाने भोयांचे पायच कापून टाकले. भोई पालखीसह खाली पडले. संभाजी कावजीने खानाचे शीर धडावेगळे करून तो महाराजांजवळ आला. नंतर शिवराय , जिवा महाला आणि संभाजी कावजी तिघेही वेगाने प्रतापगडाकडे निघून गेले.

शिवरायांनी आखून दिलेल्या मार्गानेच मराठ्यांनी पुढे वाटचाल केली. पहिले बाजीराव, रघुनाथराव , सदाशिवराव भाऊ, नानासाहेब पेशवे यांनी समर्थपणे मराठ्यांचे नेतृत्व केले. रघुनाथरावाने तर अटकेपार झेंडे लावले. त्यांची इच्छा काबूल आणि कंदहार वर भगवा ध्वज फडकवण्याची होती पण इंग्रजांच्या बंगालमधील हालचालीमुळे ती इच्छा त्यांना पूर्ण करता आली नाही. मराठ्यांची अक्रमकता आणि शक्ती याचा अनुभव ब्रिटिशांनी घेतला होता. ईस्ट इंडिया कंपनीच्या ऐतिहासिक कागदपत्रात स्पष्टपणे म्हटले आहे - हिंदुस्थानात जोपर्यंत मराठ्यांची शक्ती प्रबळ आहे तोपर्यंत हिंदुस्तान इंग्रजांना जिंकता येणार नाही.

प्रभू श्रीरामचंद्र, भगवान श्रीकृष्ण यांच्या एवढेच स्थान शिवरायांना हिंदुस्थानच्या इतिहासात आहे. शिवजयंतीचा उत्सव हा राष्ट्रीय सण आहे. शिवरायांच्या पराक्रमाचा विजयरथ त्या काळातल्या इस्लामिक आक्रमकांना रोखता आला नाही. त्याचबरोबर इंग्रज, डच, फ्रेंच, पोर्तुगीज यांनाही ही हा विजयरथ रोखण्याचे धाडस झाले नाही. म्हणूनच शिवराय हे संपूर्ण हिंदुस्थानचे आराध्य दैवत आहेत. त्यांच्या पराक्रमाचे स्मारक संपूर्ण हिंदुस्थानात चौकाचौकात ज्या दिवशी उभे राहील तो हिंदुस्थानचा खरा सुवर्ण दिवस ठरेल.

- दुर्गेश जयवंत परुळकर

व्याख्याते आणि लेखक

९८३३१०६८१२

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande