क्रीडा जगतातील द्रोणाचार्याची 'एक्झिट'
रामनामाचे शेले विणणाऱ्या संत कबिराने गुरूची महती सांगण्यासाठी शब्द कसे तोकडे पडतात याचे उदाहरण देतान
दिवंगत भाऊ काणे


रामनामाचे शेले विणणाऱ्या संत कबिराने गुरूची महती सांगण्यासाठी शब्द कसे तोकडे पडतात याचे उदाहरण देताना सांगितले होते की, जगातील समुद्राची शाई (दौत) आणि वनराईची लेखणी केली तरी गुरूचे वर्णन करणे अशक्य आहे. आईला मानवी जीवनातील पहिला गुरू मानले जाते. त्यानंतर जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात सर्वांनाच प्रेरणा आणि मार्गदर्शन देणारा गुरू लागतो. अगदी जगातील सर्वश्रेष्ठ धनुर्धर असलेल्या अर्जुनाला देखील द्रोणाचार्याची गरज भासलीच होती. असेच क्रीडा जगतातील द्रोणाचार्य म्हणून संजय बळवंत उपाख्य भाऊ काणे यांचे नाव महाराष्ट्रात अतिशय आदराने घेतले जाते. भाऊंनी तब्बल 50 वर्ष क्रीडापटू घडवण्याचे कार्य केले. त्यांच्या या देदिप्यमान जीवनप्रवासाने गेल्या वर्षी पंच्याहत्तरी गाठली होती. परंतु, नियतीच्या मनात काहीतरी निराळेच होते. भावी पिढ्या भाऊंच्या मार्गदर्शनाची प्रतीक्षा करीत असतानाच 17 मार्च 2024 रोजी भाऊंनी जगाचा निरोप घेतला.

काहींचे आयुष्य इतके विलक्षण असते की, त्यांच्या जीवनातील त्याग, योगदान, झपाटलेपणा आणि व्यक्तित्वाने वल्ली बनून केलेले कार्य थक्क करणारे आणि तितकेच प्रेरणादायी ठरते. सह्याद्री ते सातपुडा विस्तारलेल्या महाराष्ट्राच्या क्रीडा जगतात भाऊ काणे हे प्रेरणेची ललकारी देणारे नाव होते. भाऊंनी आयुष्याची पंच्याहत्तरी गाठली होती. परंतु, त्याच उत्साहाने नातवंडांच्या पिढीला त्यांचे मार्गदर्शन सुरु होते. अशातच भाऊंनी अचानक ईहलोकाचा घेतलेला निरोप चटका लावून गेला. जन्म आणि मृत्यू या प्रवासातील वाट उजळवून टाकण्याचे भाग्य काही मोजक्याच लोकांच्या वाट्याला येते क्रीडा प्रशिक्षक भाऊ काणे अशाच भाग्यवंतांच्या जातकुळातील एक होते. त्यांनी गेली अनेक दशके क्रीडापटू घडवण्याचे उत्कट आणि भव्य कार्य केले. सुखासीन आयुष्य जगण्याची संधी पायाशी लोळण घेत असताना भाऊ निस्पृहपणे रनिंग ट्रॅककडे वळले. त्यांच्या या वळण्याने अनेकांच्या आयुष्याला वळण लावले. लहानपणापासून कुशाग्र बुद्धीमत्तेची देणगी लाभलेल्या भाऊंचे शालेय शिक्षण नागपुरातील डीडीनगर विद्यालय आणि उच्च शिक्षण सि.पी.अँन्ड बेरार कॉलेजमध्ये झाले. कुटुंबाची जबाबदारी, खेळात असलेले चित्त या दोन्ही गोष्टी सांभाळून अभ्यासावर लक्ष केंद्रीत करण्याचे शिवधनुष्य भाऊंनी लिलया पेलले. “शिकणारे खेळत नाहीत आणि खेळणारे शिकत नाहीत” असा गैरसमज घेऊन वावरणाऱ्यांच्या जमान्यात भाऊंनी एमकॉमच्या परीक्षेत मेरीट लिस्टमध्ये प्रथम स्थान मिळवले होते. वास्तविक पाहता भाऊंना डॉक्टर व्हायचे होते. त्यासाठी लागणारी बुद्धीची कुशाग्रता, चित्ताची एकाग्रता आणि जिद्द हे सर्वकाही त्यांच्याकडे उपजत होते. परंतु, नियतीच्या मनात काही निराळेच समीकरण रेंगाळत होते. काही कारणास्तव भाऊंना कॉमर्सकडे वळावे लागले. इथूनच त्यांना खो-खो खेळाचा आणि नंतर ऍथलेटिक्सचा नाद जडला. एखादी गोष्ट स्वतःला येणे आणि स्वतःला येणारी गोष्ट इतरांना शिकवून त्यांना त्यात पारंगत करणे या दोन्ही गोष्टी भिन्न आहेत. परंतु, या भिन्नतेला एकसूत्रात गुंफून भाऊंनी त्याचा पुष्पहार बनवला. आज भाऊ हयात नसले तरी त्यांनी गुंफलेल्या फुलांचा गंध इथल्या क्रीडा जगतात आणि क्रीडापटूंच्या जीवनात दरवळतोय. बेताची आर्थिक स्थिती, सुविधांची कमतरता आणि मार्गदर्शनाचा अभाव यामुळे नागपूर, विदर्भातील खेळाडूंच्या वाट्याला पूर्वी यशाच्या फारशा संधी येत नसत. परंतु, जिंकण्याची जिंद्द, कष्टांची तयारी आणि सहकार्य याबळावर आयुष्यातील संकटे नाहीशी करता येतात हे भाऊंनी करून दाखवले. भाऊंचे प्रशिक्षण, प्रोत्साहन आणि प्रेरणा याबळावर नागपुरातील अनेक ऍथलिटसनी देश पातळीवर विक्रम प्रस्थापित करून नागपूरच्या शिरपेचात मानाचे तुरे रोवले आहेत. या क्रीडापटूंना जीवनाकडे बघण्याची दृष्टी, कष्टाची सवय आणि जिंकण्यासाठी लागणारे श्रम सारे काही करवणारे भाऊच होते. जगातील फार कमी लोकांना आपल्या जीवनाचे ध्येय कळते. अशा निवडक लोकांमध्ये भाऊ काणेंचा समावेश होतो. भाऊंची मूर्ती त्यांच्या टोपण नावासारखी लहानशी होती तरी त्यात बारूदीसारखा ठासून भरलेला आशय त्यांच्या गोतावळ्यात वावरणाऱ्यांना पावलोपावली जाणवायचा. त्यांनी केलेले परिश्रम आणि कष्ट याची दखल घेऊन भाऊंना दादोजी कोणदेव क्रीडा प्रशिक्षक पुरस्काराने गौरवण्यात आले होते. पुरस्काने हुरूप आणि आनंद वाटत असला तरी भाऊंचे मन कधीच अशा पुरस्कारांच्या भोवती रूंजी घालत बसले नाही. त्यापेक्षा आपल्या शिष्यांचे यश, त्यांचे अवार्ड आणि लौकिक भाऊंना अधिक सुखावून जायचे. माणूस जन्मनाला आल्यापासून जगाकडून वेळोवेळी काही ना काही मागत असतो. पण, ध्येयाने झापाटलेले भाऊ आणि त्यांच्यासारखे लोक इतरांना खूप काही देऊन जातात. ते सुद्धा अगदी निस्पृहपणे, कुठल्याही मोबदल्याची अपेक्षा न ठेवता.

मनीष कुलकर्णी


 rajesh pande