नारायण राणे यांच्यासाठी निवडणूक आव्हानात्मक
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार म्हणून भारतीय जनता पक्षातर्फे विद्यमान के
नारायण राणे


रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार म्हणून भारतीय जनता पक्षातर्फे विद्यमान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. आपण ही निवडणूक सहज जिंकू शकू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला असला, तरी अनेक राजकीय अंतःप्रवाहांमुळे त्यांना ही निवडणूक तशी आव्हानाची ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.

यावेळीच्या लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाने ४०० हून अधिक जागा जिंकायचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. त्यापैकी अधिकाधिक जागा भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांनी जिंकाव्यात, अशी व्यूहरचना पक्षाने केली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट या मित्रपक्षांच्या बरोबर झालेल्या वाटाघाटींनंतरही सर्वाधिक जागा भारतीय जनता पक्ष लढविणार असल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार रत्नागिरीची जागा भारतीय जनता पक्षाचा उमेदवारच लढविणार असल्याचे खूपच पूर्वी निश्चित झाले असावे. याचे कारण निवडणूक जाहीर होण्याच्या आधी सुमारे दोन महिने भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते विविध उपक्रमांनी कमळ या निशाणीवरील उमेदवारच लोकसभेत निवडून पाठवायचा आहे, असा प्रचार घरोघरी करण्यात यशस्वी झाले आहेत. कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषद गटनिहाय प्रचार केला आहे. पूर्वी अशा तऱ्हेचा प्रचार मूळ शिवसेनेचे कार्यकर्ते करत असायचे. यावेळी त्या प्रचाराचा अभाव राजकीय गोंधळामुळे जाणवला.

या पार्श्वभूमीवर रत्नागिरीची उमेदवारी नारायण राणे यांना जाहीर करण्यात आली आहे. ही जागा मिळण्यासाठी राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी त्यांचे ज्येष्ठ बंधू किरण ऊर्फ भैय्या सामंत यांच्यासाठी कंबर कसली होती. गेल्या सहा महिन्यांपासून विविध कार्यक्रमांमध्ये भावी खासदार असाच किरण सामंत यांचा उल्लेख केला जात होता. अगदी गल्लीबोळातल्या छोट्या कार्यक्रमांपासून मोठ्या कार्यक्रमांपर्यंत विविध व्यासपीठांवर किरण सामंत यांना आवर्जून स्थान दिले जात होते. अखेरच्या क्षणापर्यंत त्यांना उमेदवारी मिळवून देण्याचे उदय सामंत यांचे प्रयत्न निष्फळ ठरले. राष्ट्रवादी काँग्रेस, शिंदे गट शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष अशा तिघांची युती असली तरी त्यापैकी शिवसेना गटाचे उदय सामंत यांच्याकडून महायुतीचा म्हणून प्रचार अद्याप झालेला नाही. त्याचप्रमाणे तो शिवसेनेच्या उमेदवारासाठीसुद्धा झाला नव्हताच. आता निवडणुकीला १७-१८ दिवस राहिले असताना ते प्रचारामध्ये कितपत सहभागी होतात, हे लक्षात घेतले पाहिजे. कारण उदय सामंत यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये गेल्या वीस वर्षांत प्रथमच माघार घेतली आहे. त्यामुळे त्यांच्या नाराजीचे प्रतिबिंब प्रचारात उमटण्याची शक्यता आहे.

अर्थातच शिवसेनेची फाटाफूट झाली असली तरी मूळचा शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेशी एकनिष्ठ असल्याचे चित्र जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाहायला मिळते. उदय सामंत पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. तेथून ते शिवसेनेमध्ये दहा वर्षांपूर्वी दाखल झाले. तेव्हा त्यांच्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसमधून आलेले नेते आणि कार्यकर्ते आता शिवसेनेचे कार्यकर्ते झाले आहेत. श्री. सामंत यांनी दोन वर्षांपूर्वीच्या फाटाफुटीनंतर एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केल्यानंतर त्यांच्याबरोबरचे सर्व नेते कार्यकर्ते त्या गटात सामील झाले आहेत. बहुसंख्येने असलेले मूळचे शिवसैनिक तसे अलिप्तच राहिले आहेत. आताच्या नाराजीनंतर आणि भविष्यातील राजकीय घडामोडींचा वेध घेण्यात पटाईत असलेले महत्त्वाकांक्षी उदय सामंत या मुरब्बी नेत्याच्या कार्यप्रणालीवर नारायण राणे यांचा त्यांच्याकडून कितपत प्रचार होतो, हे अवलंबून आहे. किरण सामंत यांच्या उमेदवारीसाठी श्री. सामंत प्रयत्नशील असले तरी खुद्द किरण सामंत यांचा मतदारसंघामध्ये कोणताही प्रभाव आणि संपर्क नाही. कारण त्यांना राजकीय किंवा सामाजिक पार्श्वभूमीही नाही. त्यामुळे त्यांचा नारायण राणे यांच्या प्रचारात कितपत उपयोग होतो, हे सांगता येणार नाही.

खुद्द नारायण राणे यांचा रत्नागिरीपेक्षा सिंधुदुर्ग जिल्ह्यावर अधिक प्रभाव आहे. पण सिंधुदुर्गातील विधानसभेच्या तीन मतदारसंघांपेक्षा रत्नागिरी जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघांमधील मतदारांची संख्या अधिक आहे. त्यामुळे प्रचारामध्ये त्यांना रत्नागिरीकडे अधिक लक्ष द्यावे लागणार आहे. त्यामध्ये उदय सामंत अडसर ठरतात की अनुकूल ठरतात, यावर श्री. राणे यांचे यश अवलंबून आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात त्यांना तुलनेने कमी प्रयत्न करावे लागतील, असे चित्र आहे. कारण त्यांचे दोघे पुत्र आमदार नितेश राणे आणि माजी खासदार नीलेश राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्हा आधीच ढवळून काढला आहे. शिवाय विविध स्थानिक स्वराज्य संस्थांवर त्यांचे वर्चस्व आहे. त्याचा उपयोग निवडणुकीत त्यांना होऊ शकतो.

रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर विधानसभा मतदारसंघात होऊ घातलेल्या रिफायनरी प्रकल्पाला भारतीय जनता पक्षाचा पाठिंबा आहे. नारायण राणे यांनीही व्यक्तिशः यापूर्वी अनेक वेळा प्रकल्पाला पाठिंबा दर्शविला आहे. त्यामुळे राजापूर मतदारसंघात त्यांच्या विरोधात मतदान होऊ शकते. त्यासाठी तेथे त्यांना लक्ष द्यावे लागणार आहे. रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात याआधी उल्लेख केल्याप्रमाणे उदय सामंत यांचा प्रभाव असल्यामुळे ते जी दिशा देतील, त्यावर राणेंचे मतदान ठरणार आहे. चिपळूण विधानसभा मतदारसंघात मात्र राणे यांना चांगले मतदान होईल, अशी शक्यता आहे. याचे कारण तेथील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शेखर निकम नेमस्त नेते आहेत. पक्षाकडून आदेश आल्यानंतर ते त्याची अंमलबजावणी करण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करतील. ते अजित पवार गटाचे सदस्य आहेत. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात सुमारे साडेदहा लाख मतदार आहेत. सत्तर टक्के मतदान होईल असे गृहीत धरले तर सात लाख मतदान होईल. त्यापैकी साडेतीन लाख मतदान रत्नागिरी जिल्ह्यातील तर अडीच लाख मतदान सिंधुदुर्ग जिल्ह्यातील असेल. म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यातील लाखाहून अधिक मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यात नारायण राणे यांना प्रयत्न करावे लागणार आहेत. काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या निवडणुकीमुळे त्यात त्यांना कितपत यश येईल, हे मतदानाच्या दिवशीच ठरणार आहे. मात्र भारतीय जनता पक्षाने गेल्या तीन महिन्यांपासून चालविलेल्या प्रचाराला आणि उद्दिष्टाला यश आल्यामुळे भाजपचे कार्यकर्ते मात्र आता अतिशय जोमाने काम करणार आहेत. त्यामुळे त्यांना यशाची खात्री वाटते.

- बाळकृष्ण कोनकर

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande