नांदेड : माथेफिरूकडून ईव्हीएमची तोडफोड
बिलोली तालुक्यातील रामतीर्थ इथली घटना नांदेड, 26 एप्रिल (हिं.स.) : नांदेड लोकसभा मतदारसंघात आज, शुक्
माथेफिरूकडून ईव्हीएमची तोडफोड


बिलोली तालुक्यातील रामतीर्थ इथली घटना

नांदेड, 26 एप्रिल (हिं.स.) : नांदेड लोकसभा मतदारसंघात आज, शुक्रवारी दुसऱ्या टप्प्यातील मतदान झाले. या मतदारसंघात ग्रामीण भागातील मतदान केंद्रावर एका माथेफिरू इसमाने ईव्हीएममशिनची कुऱ्हाडीनं तोडफोड केल्याचा गंभीर प्रकार घडला आहे. भय्यासाहेब येडके असे या आरोपीचे नाव असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.

यासंदर्भातील माहितीनुसार नांदेड जिल्ह्यातल्या बिलोली तालुक्यातील रामतीर्थ या गावात भय्यासाहेब येडके नामक इसम आपल्यासोबत एक कुऱ्हाड घेऊन मतदान केंद्रावर गेला. त्याने आपल्यासोबत लपवून कुऱ्हाड मतदान केंद्रात नेली होती. मतदान केंद्रात प्रवेश करताच ईव्हीएम मशीनसह व्हीव्हीपॅट व इतर साहित्याची कुऱ्हाडीने नासधूस केली. या इसमाच्या हातात कुऱ्हाड पाहून केंद्रावरील निवडणूक अधिकारी व इतर कर्मचारी आणि एजंट यांनी केंद्रातून बाहेर पळ काढला. त्यानंतर आरोपीने छोट्या कुऱ्हाडीने मशीनवर एकामागोमाग एक प्रहार करणे सुरू ठेवले. त्यामुळे मशीनची तोडफोड झाली. दोन मशीन, कागदपत्रे खाली पडली. सर्व सामान अस्तव्यस्त पडलं. मशीनची तोडफोड सुरू असल्याची माहिती मिळताच मतदान केंद्रावरील पोलिसांनी तात्काळ मतदान केंद्रात धाव घेतली आणि मशीनची तोडफोड करणाऱ्या तरुणाला अटक केली. भय्यासाहेब एडके असं या तरुणाचं नाव आहे. त्याने या मशीन का फोडल्या? या मागे कुणाचा हात आहे काय? तो कुठल्या पक्षाशी संबंधित आहे काय? तो राहतो कुठे? काय करतो? याची माहिती पोलीस घेत आहेत. त्याच्यावर गुन्हा दाखल केला जाणार असल्याचंही पोलीस सूत्रांनी सांगितले.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande