लोकसभा निवडणूक : दुसऱ्या टप्प्यात 64.70 टक्के मतदान
महाराष्ट्रातील 8 जागांवर सरासरी 53.71 टक्के मुंबई, 26 एप्रिल (हिं.स.) : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्य
अमरावतीत खा. नवनीत राणांनी मतदान केले


महाराष्ट्रातील 8 जागांवर सरासरी 53.71 टक्के

मुंबई, 26 एप्रिल (हिं.स.) : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी आज, शुक्रवारी 26 एप्रिल रोजी मतदान झाले. दुसऱ्या टप्प्यात 13 राज्यांतील 88 जागांवर 64.70 टक्के मतदान झाले. तर महाराष्ट्रातील 8 जागांवर संध्याकाळी सरासरी 53.71 टक्के मतदानाची नोंद करण्यात आली. गेल्या निवडणुकीच्या (2019) तुलतेन यंदा उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि राजस्थानमध्ये कमी मतदानाची नोंद झाली आहे.

निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात देशभरातील 89 जागांवर मतदान होणार होते, मात्र मध्य प्रदेशातील बैतुल मतदारसंघातील बसपाच्या उमेदवाराचा मृत्यू झाल्याने केवळ 88 जागांवर मतदान झाले. या जागांसाठी एकूण 1198 उमेदवार रिंगणात आहेत, त्यापैकी 1097 पुरुष आणि 100 महिला उमेदवार आहेत, तर एक उमेदवार तृतीयपंथी आहे. दुसऱ्या टप्प्यात 64.70 टक्के मतदानाची नोंद झाली. या सर्व मतदारसंघांमध्ये मतदानाची वेळ संपेपर्यंत अर्थात संध्याकाळी 6 वाजेपर्यंत सरासरी 64.70 टक्के मतदान झालं. तर यांपैकी महाराष्ट्रात 8 मतदारसंघात 53.71 टक्के मतदान झालं. यामध्ये वर्धा लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक 56.66 टक्के मतदानाची नोंद झाली. निवडणूक आयागाने ही आकडेवारी जाहीर केली आहे.

दुसऱ्या टप्प्यात आज झालेल्या मतदानात प्रकाश आंबेडकर (अकोला), नवनीत राणा (अमरावती), रविकांत तुपकर (बुलडाणा), रामदास तडस (वर्धा) यांच्यासह देशभरात ओम बिर्ला, राहुल गांधी, हेमा मालिनी, अरुण गोविल, एच. डी. कुमारस्वामी, शशी थरूर, भूपेश बघेल, के. सी. वेणुगोपाल, दानिश अली या महत्वाच्या उमेदवारांचं भवितव्य ईव्हीएममध्ये कैद झाले आहे. महाराष्ट्रातील 8 मतदारसंघांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना यांच्यात थेट लढत पाहायला मिळत आहे. परभणीत राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर आणि शिवसेनेचे खासदार संजय जाधव यांच्यात लढत आहे. अकोल्यात भाजपचे अनुप धोत्रे आणि काँग्रेसचे अभय पाटील आमने-सामने आले आहेत. दरम्यान, अमरावतीत आता भाजपच्या उमेदवार म्हणून निवडणूक लढविणाऱ्या खासदार नवनीत राणा आणि काँग्रेसचे बळवंत वानखेडे यांच्यात लढत आहे.

संध्याकाळी 5 वाजेपर्यंत महाराष्ट्रातील वर्धा मतदारसंघात 56.66 टक्के, वाशिम-यवतमाळ 54.04 टक्के, अमरावती 54.50 टक्के, अकोला 52.49 टक्के, बुलडाणा – 52.88 टक्के, हिंगोली 52.02 टक्के, परभणीत 53.70 टक्के आणि नांदेडमध्ये 53.53 टक्के मतदानाची नोंद झाली.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande