संस्कृत दैवी भाषा, आपल्या आध्यात्मिक प्रवासात ती सेतू म्हणून भूमिका बजावते - उपराष्ट्रपती
तिरुपती, 26 एप्रिल (हिं.स.) - संस्कृत ही दैवी भाषा असून दिव्यत्वाशी जोडले जाण्याच्या आपल्या आध्यात्म
VP Dhankad


तिरुपती, 26 एप्रिल (हिं.स.) - संस्कृत ही दैवी भाषा असून दिव्यत्वाशी जोडले जाण्याच्या आपल्या आध्यात्मिक प्रवासात ती सेतू म्हणून भूमिका बजावते, असे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी म्हटले आहे.

उपराष्ट्रपतींनी आज तिरुपती येथे राष्ट्रीय संस्कृत विद्यापीठाच्या तिसऱ्या दीक्षांत सोहळ्याला संबोधित केले. वादळात सापडलेल्या जहाजासाठी नांगर जसा भक्कम आधार ठरतो त्याप्रमाणे संस्कृत हा मानवी संस्कृतीचा भक्कम सांस्कृतिक आधार आहे, असे उपराष्ट्रपती म्हणाले. आजच्या वावटळीत संस्कृत एक अनोखा आधार पुरवते. अविचल बुद्धी, आध्यात्मिक शांती, आणि आपले व विश्वाचे गहिरे नाते, यात संस्कृत महत्त्वपूर्ण भूमिका बजावते.

दीक्षांत समारंभापूर्वी धनखड यांनी पवित्र तिरुमला मंदिरात दर्शन घेतले. तिरुपती येथे दैवी तत्त्व, अध्यात्मिकता आणि उदात्ततेच्या जवळ जाण्याची अनुभूती मिळाल्याचे उपराष्ट्रपतींनी म्हटले आहे.

भारतीय ज्ञान प्रणालीच्या पुनरुज्जीवन आणि प्रसारामध्ये राष्ट्रीय संस्कृत विद्यापीठासारख्या संस्थांचे महत्त्व उपराष्ट्रपतींनी अधोरेखित केले. संस्कृतचा समृद्ध वारसा आणि आधुनिक शिक्षणाच्या गरजा यातली दरी बुजवण्यासाठी अभिनव अभ्यासक्रम विकसित करण्याचे आणि आंतरविद्याशाखीय संशोधनाला चालना देण्याचे आवाहन त्यांनी केले. ''पवित्र संस्कृत भाषा आपल्याला दिव्यत्वाशी जोडण्यासोबतच जगाचे अधिक समग्र आकलन होण्यात पथदर्शी ठरावी'', असे उपराष्ट्रपती म्हणाले. बहुमूल्य प्राचीन हस्तलिखितांच्या जतनात डिजिटल तंत्रज्ञानाचा उपयोग वाढवण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.

संस्कृत हा आपल्या सांस्कृतिक वारशाचा खजिना असून तिचे संवर्धन आणि प्रसार हे आपले राष्ट्रीय प्राधान्य आणि कर्तव्य असल्याचे उपराष्ट्रपती म्हणाले.

संस्कृतचा अभ्यास केवळ शैक्षणिकदृष्ट्या मर्यादित नसून आत्मशोध आणि ज्ञानप्राप्तीचा हा प्रवास असल्याचे प्रतिपादन उपराष्ट्रपतींनी केले. संस्कृतचा वारसा पुढे चालवा -मार्ग नव्हे केवळ शैक्षणिक ज्ञानाचा, तर मार्ग हा परिवर्तनाचा, असे सांगत भावी पिढ्यांपर्यंत हा खजिना पोहोचण्याची सुनिश्चिती व्हावी यासाठी या बहुमूल्य वारशाचे दूत होण्याचे आवाहन उपराष्ट्रपतींनी विद्यार्थ्यांना केले.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande