राहुल कळंबटे यांनी काढलेल्या बालिकेच्या थ्रीडी रांगोळीला देशात चौथा क्रमांक
रत्नागिरी, 26 एप्रिल, (हिं. स.) : थ्रीडी रांगोळीत तीन जागतिक विक्रम केलेले रत्नागिरी तालुक्यातील माल
राहुल कळंबटे यांनी काढलेल्या बालिकेच्या थ्रीडी रांगोळीला देशात चौथा क्रमांक


रत्नागिरी, 26 एप्रिल, (हिं. स.) : थ्रीडी रांगोळीत तीन जागतिक विक्रम केलेले रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड येथील रांगोळीकार राहुल कळंबटे यांनी दोन वर्षांपूर्वी काढलेल्या बालिकेच्या थ्रीडी रांगोळीला देशात चौथा क्रमांक मिळाला आहे.

राजस्थानातील २७ आर्ट पॉइंट संस्थेतर्फे ही राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा घेण्यात आली. राहुल कळंबटे यांनी अतिशय प्रतिकूल आर्थिक परिस्थितीत अगदी मोलमजुरी करून कलेचे शिक्षण घेतले. २०१० मध्ये अंशकालीन भरतीमध्ये कलाशिक्षक म्हणून पालिका शाळेत ६ महिने कंत्राटी काम मिळाले. शाळेत असतानाच त्यांनी संस्कारभारती रांगोळीची सुरुवात केली. व्यक्तिचित्रण रांगोळी शिकायची खूप इच्छा होती. पण यातील दिग्गजांनी रांगोळी शिकवण्यास नकार दिला. मात्र रत्नागिरीतील कलाकार प्रशांत राजिवले आणि राजू भातडे या समवयस्क रांगोळी कलाकारांनी त्यांना संधी दिली. त्यांच्यासोबत राहून राहुल कळंबटे रांगोळी काढायला लागले. त्याआधी ते कागदावर व्यक्तिचित्रण करत होते. पण नंतर त्यांनी रांगोळीतून व्यक्तिचित्रण करायला सुरुवात केली आणि त्यातील थ्रीडी या अभिनव रांगोळीने त्यांना सांगली येथे राज्यस्तरीय प्रथम क्रमांक मिळवून दिला. त्यानंतर त्यांच्या हातून अनेक थ्रीडी रांगोळ्या साकार झाल्या. आतापर्यंत त्यांनी सुमारे बारा विविध व्यक्तींच्या थ्रीडी रांगोळ्या काढल्या. त्यात प्रत्यक्ष मुलाचादेखील समावेश आहे.

दोन वर्षांपूर्वी रत्नागिरी शहरातील सहकार नगर येथील राधाकृष्ण रेसिडेन्सीतील रहिवासी स्वरूप मिरजुळकर यांची मुलगी स्वर्णी हिच्या पहिल्या वाढदिवशी राहुल कळंबटे यांनी १७ तासांत तिचे थ्रीडी रांगोळीतून हुबेहूब चित्र साकार केले. या रांगोळीचे फोटो राज्यभरातच नव्हे तर इतर राज्यांमध्येही व्हायरल झाले. त्यामुळे या थ्रीडी रांगोळीला प्रचंड प्रसिद्धी मिळाली. राजस्थानात २७ आर्ट पॉइंट संस्थेतर्फे नववी नॅशनल ऑनलाइन आर्ट कॉम्पिटिशन घेण्यात आली. त्यात देशातील ३५० पेक्षा जास्त कलाकार सहभागी झाले होते. या स्पर्धेत रियलॅस्टिक पेंटिंग, लँडस्केप पेंटिंग, फोटोग्राफी, प्रिंटमेकिंग, अॅबस्ट्रॅक्ट पेंटिंग, पोर्ट्रेट, स्क्लप्चर, मिक्स मीडिया, डिजिटल पेंटिंग, रांगोळी या सर्व प्रकारांचा समावेश होता. त्यांचे फोटोग्राफ ऑनलाइन मागविण्यात आले होते. राहुल कळंबटे यांनी स्वर्णी हिच्या थ्रीडी रांगोळीचा फोटो स्पर्धेसाठी पाठविला. या थ्रीडी रांगोळीने या स्पर्धेतही बाजी मारत कळंबटे यांना देशात चौथा क्रमांक मिळवून दिला.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande