रत्नागिरी : यावेळचे मतदान भारतासाठी महत्त्वाचे - देवेंद्र फडणवीस
रत्नागिरी, 27 एप्रिल, (हिं. स.) : यावेळचे मतदान हे भाजपासाठी नाही तर भारतासाठी महत्त्वाचे आहे. यावेळ
रत्नागिरी : यावेळचे मतदान भारतासाठी महत्त्वाचे - देवेंद्र फडणवीस


रत्नागिरी, 27 एप्रिल, (हिं. स.) : यावेळचे मतदान हे भाजपासाठी नाही तर भारतासाठी महत्त्वाचे आहे. यावेळी तुमच्यासमोर दोनच पर्याय आहेत, एक नरेंद्र मोदी तर दुसरा राहुल गांधी. राहुल गांधींच्या इंजिनमध्ये फक्त सोनिया गांधी व प्रियांका गांधी यांनाच जागा आहे, तर मोदींचे इंजिन सर्वसामान्य जनतेचे आहे. त्यामुळे कोकणच्या भविष्यासाठी राणे-मोदी हे कॉंबिनेशन खूप महत्त्वाचे आहे. राणे जगात कुठेही असले तरी त्यांच्या डोळ्यांसमोर फक्त आणि कोकण असतो, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजापूर येथे केले.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रचारार्थ श्री. फडणवीस काल (दि. २६ एप्रिल) राजापूरला आले होते. राजापूर शहरातील राजीव गांधी मैदानावर पार पडलेल्या या प्रचार सभेसाठी राज्याचे उद्योगमंत्री व रत्नागिरीचे पालक मंत्री उदय सामंत, शिक्षणमंत्री दीपक केसरकर , बांधकाम मंत्री व सिंधुदुर्गचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, केंद्रीय मंत्री नारायण राणे, आमदार नीतेश राणे व महायुतीतील सर्वपक्षीय नेते उपस्थित होते.

ही निवडणूक देशासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. लोकसभेची ही निवडणूक कोणत्याही ग्रामपंचायत, नगरपालिका, जिल्हा परिषदेची निवडणूक नाही, तर देशाला कोण पुढील पाच वर्षे सुरक्षित ठेवू शकतो, हे ठरवण्याची आहे. त्यामुळे जान है तो जहा है यासाठी मतदान करणे गरजेचे असल्याचे मत फडणवीस यांनी मांडले. गेल्या दहा वर्षांच्या काळात मोदी पंतप्रधान असताना त्यांनी केलेल्या सर्व विकासात्मक कामांचा आढावा त्यांनी यावेळी घेतला. अर्थव्यवस्था मोठी झाली तर संधी तयार होतात आणि संधी तयार झाल्या की आपोआप उद्योग येतात, असेही फडणवीस यावेळी म्हणाले.

गेल्या दहा वर्षांत मोदींनी देश बदलला आहे. समाजातल्या प्रत्येक घटकाला सोबत घेऊन मोदी पुढे चालताहेत. बारा बलुतेदारांसाठी योजना आणली व त्यांचा विकास बळकट केला. कोविडनंतर पुढची फॅक्टरी ऑफ वर्ल्ड फक्त भारत असल्याचे सगळे जग मानते आहे. आज जगाच्या आशा भारताकडे आहेत. त्यामुळे पुन्हा मोदी पंतप्रधान बनणे देशहिताचे आहे. मोदींना मत देण्यासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणेंना मत द्या. राणे मोदींसोबत असतील तर कोकणच्या विकासासाठी निधी आणतील व कोकणचा विकास दुप्पट वेगाने होईल. राणे-मोदी हेच कोकणच्या विकासाचे कॉम्बिनेशन आहे, असेही यावेळी फडणवीस म्हणाले.

२०१९ नंतर पाकिस्तानची भारताकडे डोळे वर करून पाहायची एकदाही हिम्मत झाली नाही. आता देशात एकही बॉम्बस्फोट होत नाही. मोदींनी देशाच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. आज आपल्या देशाकडे सात किलोमीटरवर लपलेल्या शत्रूचे तळ उद्ध्वस्त करण्याचे सामर्थ्य असणारे क्षेपणास्त्र आहे. अशी क्षमता फक्त अमेरिका व चीनकडेच होती, मात्र आता मोदींनी देशाला पुढे नेले असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

महाराष्ट्र आज देशात औद्योगिक राज्य म्हणून ओळखले जात असून गेल्या दोन वर्षांत पुन्हा महाराष्ट्र देशात औद्योगिक क्षेत्रात एक नंबरवर आहे. हे केवळ महाराष्ट्र मोदींबरोबर असल्यामुळे शक्य आहे. आता राज्यात वसुली सरकार नाही, तर विकासाचे सरकार आहे. मागचे अडीच वर्षांचे सरकार वसुली सरकार होते, अशी टीका त्यांनी यावेळी केली.

परवा शरद पवारांनी राष्ट्रवादीचा जाहीरनामा प्रसिद्ध केला, तर काल उद्धव ठाकरेंनी आपला जाहीरनामा जाहीर केला. पण उद्धव ठाकरेंच्या हातातून तो खाली पडला, म्हणजे त्यांचा जाहीरनामाही जाहीर व्हायलाच तयार नाही. इंडिया आघाडीतले हे सगळे जाहीरनामे म्हणजे राहुल गांधींचे जाहीरनामे आहेत. यांनी आपले स्वतंत्र जाहीरनामे जाहीर करून उपयोग काय, असा प्रश्नही यावेळी फडणवीस यांनी उपस्थित केला.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande