नाशकातील स्टार्टअप्सच्या पंखांना 65 कोटींचे बळ
नाशिक, २७ एप्रिल, (हिं.स.) - नाशकातील स्टार्ट अप्सना मोठ्या प्रमाणात आर्थिक सहाय्य करण्याचे आश्वासन
नाशकातील स्टार्टअप्सच्या पंखांना 65 कोटींचे बळ


नाशिक, २७ एप्रिल, (हिं.स.) - नाशकातील स्टार्ट अप्सना मोठ्या प्रमाणात आर्थिक सहाय्य करण्याचे आश्वासन बड्या गुंतवणूकदारांनी दिले असून निमा स्टार्टअप समिटमध्ये त्याबाबत 65 कोटींचे करार प्रत्यक्षात येण्याचे संकेत मिळाल्याने उद्योग क्षेत्रात नवनवीन अविष्कार घडविणाऱ्या आणि विशेषतः महिला व युवा उद्योजकांमध्ये चैतन्याचे वातावरण पसरले आहे. निमा अध्यक्ष धनंजय बेळे यांनी याबद्दल गुंतवणूकदारांना धन्यवाद दिले.

ज्या स्टार्टअप्सनी उत्पादकीय मॉडेल बनविले होते. त्यांच्यासाठी निमा समिटमध्ये प्रदर्शनीय दालन उपलब्ध करून दिले होते.त्यांच्यादृष्टीने हे समिट जणू एक प्रकारे पर्वणीच ठरली.वित्त साहाय्यासाठी मुंबई, पुणे,बंगळूरु नाशिक तसेच राज्याबाहेरीलही गुंतवणूकदारांना पाचारण करण्यात आले होते.सुमारे 75 ते 80 गुंतवणूकदार यावेळी उपस्थित होते. त्यांच्यासमोर स्टार्टअप चालकांनी आपल्या स्टार्टअपचे सादरीकरण केले. प्रत्येकाने सादर केलेले नवनवीन संशोधन व उत्पादन बघून गुंतवणूकदारांसह उपस्थित उद्योजकही थक्क झाले.

अनेक स्टार्टअप चालकांनी आपण मॉडेल कसे बनवले आणि त्यापासून आपण कसे घडलो याची इत्यंभूत माहिती सादर केली.प्रत्येकाने आपला प्रवासही कथन केला.त्यासाठी आलेल्या अडचणींवर कशी मात केली हेही सर्वांनीच नमूद केले.आपल्या उत्पादनांना लार्ज स्केलवर न्यायचे असेल तर गुंतवणूकदारांनी आम्हाला प्रोत्साहन द्यावे आणि सढळ हाताने मदत करावी, असे आवाहन केले. 50 लाख रुपयांपासून 25 कोटीपर्यंतची मागणी स्टार्टअप्स चालकांनी उपस्थित गुंतवणुकदारांकडे केली व त्याला सर्वच गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला आणि 65 कोटींचे करार प्रत्यक्षात येण्याचा मार्ग सुकर झाला आणि हेच या समिटचे खरे फलित म्हणावे लागेल.

भारतातील सर्वात पहिली हायड्रोजनवर चालणारी रिक्षा पंतप्रधानांनीसुद्धा जिचा विशेष करून गौरव केला आहे त्याचेही सादरीकरण या समिटमध्ये झाले व तो स्टार्टअप नाशिक मधलाच असल्याने सर्वांनाच त्याचा अभिमान वाटला.

स्टार्टअप्स तसेच उद्योजकांना विविध पातळीवरून मदत आणि त्यांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्याच्या दृष्टीने निमा सातत्याने प्रयत्नशील असते. निमातर्फे आयोजित बँक समिटच्या माध्यमातून आम्ही अनेक उद्योजकांच्या बँकेशी निगडित असलेल्या समस्यांवर तोडगा काढून बँक आणि उद्योजक यांच्यात सौहार्दाचे वातावरण निर्माण केले होते. अनेक कर्ज प्रकरणे तातडीने मंजूर करण्यातही यश आले होते. आता स्टार्टअप समिटच्या माध्यमातून अनेक स्टार्टअप्सना आर्थिक मदत मिळवून देण्यात निमाचे योगदान मोलाचे राहिले ही आमच्यादृष्टीने गौरवाची बाब असल्याचे निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे यांनी सांगितले.

या समीटच्या माध्यमातून स्टार्ट उप व महिला सक्षमीकरणाची चळवळ अधिक मजबूत होईल असा विश्वास आमच्यात निर्माण झाला आहे. नाशकात मोठ्या प्रमाणात पोटेन्शियल असून औद्योगिक क्षेत्रात नवनवीन प्रयोग करणाऱ्या आणि कलाविष्कार घडवून आणणाऱ्या उद्योजकांच्या पाठीशी निमा खंबीरपणे उभी राहील, असे अभिवचनही बेळे यांनी यावेळी दिले.

तत्पूर्वी, आजच्या दुसऱ्या दिवशीच्या पहिल्या सत्रातील सेमिनारमध्ये इएसडीएसचे संस्थापक पियुष सोमाणी यांनी आपली यशोगाथा उलगडून सांगताना उद्योजकांना उद्योग कसा करावा,याचा कानमंत्र दिला व उद्योजकांनी काळानुरूप नवीन तंत्रज्ञानाची कास धरून आपल्या उत्पादनांमध्ये बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्नशील राहावे, असे आवहानही केले. कठोर परिश्रम जिद्द आणि चिकाटी असेल तर कितीही आव्हाने आले तरी त्यावर मात करून तुम्ही यशाचे शिखर गाठू शकता, असेही त्यांनी आपल्या मौलिक मार्गदर्शनात नमूद केले.

गुंतवणुकदारांच्या सत्रा नंतर स्टार्टअप व गुंतवणूकदार यांच्यामध्ये परस्पर संवाद बैठका घडून आल्या. त्यामध्ये गुंतवणूकदारांनी ही स्टार्टअप्स कडून सर्व माहिती घेऊन आपले करार अस्तित्वात आणण्याच्या वाटचालीचे पाऊल टाकले.

सर्वच महिला उद्योजिका व स्टार्टप्सने निमाला भरभरून धन्यवाद देत असताना अशा समिट वेळोवेळी आयोजित करण्याबद्दलही विनंती केली.

दोन दिवसाच्या समिटमध्ये नासिक व इतर शहरातील जवळपास 2000 हून अधिक उद्योजक महिला व्यापारी शासकीय अधिकारी यांनी भेट दिली. अत्यंत उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न झालेल्या स्टार्ट अप समिटचा समारोप प्रसंगी सर्व सहभागी स्टार्टअप व महिला उद्योजिकांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande