राहुल गांधींची सुल्तानपूरच्या कोर्टात हजेरी
अमित शहांची मानहानी केल्याचे प्रकरण सुलतानपूर, 26 जुलै (हिं.स.) : लोकसभेतील विरोधी पक्षनेते, राहुल गांधी शुक्रवारी मानहानीच्या खटल्यात उत्तरप्रदेशच्या सुलतानपूर खासदार-आमदार (एमपी/एमएलए) न्यायालयात हजर झाले होते. त्यांनी कोर्टात आपले म्हणणे नोंदवले
Rahul Gandhi


अमित शहांची मानहानी केल्याचे प्रकरण

सुलतानपूर, 26 जुलै (हिं.स.) : लोकसभेतील विरोधी पक्षनेते, राहुल गांधी शुक्रवारी मानहानीच्या खटल्यात उत्तरप्रदेशच्या सुलतानपूर खासदार-आमदार (एमपी/एमएलए) न्यायालयात हजर झाले होते. त्यांनी कोर्टात आपले म्हणणे नोंदवले.

भाजपचे स्थानिक नेते विजय मिश्रा यांनी 4 ऑगस्ट 2018 रोजी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी 2018 मध्ये बेंगळुरूमध्ये तत्कालीन भाजप अध्यक्ष आणि विद्यमान गृहमंत्री अमित शहा यांच्याविरोधात आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचा आरोप करत मानहानीचा खटला दाखल केला होता. या प्रकरणी न्यायालयाने 20 फेब्रुवारी रोजी राहुलला जामीन मंजूर केला होता. विशेष न्यायाधीशांनी या खटल्यातील जबाब नोंदवण्यासाठी राहुल यांना 26 जुलै रोजी न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार आज, शुक्रवारी सकाळी 11 वाजता राहुल गांधी सुलतानपूरच्या खासदार-आमदार न्यायालयात हजर झाले. यावेळी त्यांच्या स्वागतासाठी दिवाणी न्यायालय परिसरात मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते. राहुल सिव्हिल कॉम्प्लेक्समध्ये पोहोचले आणि 15 क्रमांकाच्या कोर्टात विशेष न्यायाधीशांसमोर हजर झाले. यावेळी नागरी संकुलात पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. कोर्टात जबाब नोंदवून राहुल गांधी परतले.राहुल गांधींचे वकील काशी प्रसाद शुक्ला यांनी सांगितले की, राहुल गांधी यांनी विशेष न्यायाधीश शुभम वर्मा यांच्यासमोर न्यायालयात सांगितले की, माझ्याविरोधात न्यायालयात दाखल करण्यात आलेला खटला स्वस्त लोकप्रियता मिळविण्यासाठी करण्यात आला आहे पुढील कारवाईसाठी 12 ऑगस्टपर्यंत आता फिर्यादीच्या वकिलामार्फत पुरावे सादर केले जातील.

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande