घटनात्मक पदावरील व्यक्तीचा देशाच्या शत्रुंसोबत सहभाग निंदनीय- उपराष्ट्रपती
नवी दिल्ली, 12 सप्टेंबर (हिं.स.) : घटनात्मक पदावरील व्यक्तीचा देशाच्या शत्रूंमध्ये समावेश होणे निंदनीय, घृणास्पद आणि असह्य असल्याचे उपराष्ट्रपती धनखड यांनी म्हटले आहे. संसद भवन संकुलातील राज्यसभा सचिवालयात इंटर्नशिप करणाऱ्या विद्यार्थ्यांना संबोधित
जगदीप धनखड


नवी दिल्ली, 12 सप्टेंबर (हिं.स.) : घटनात्मक पदावरील व्यक्तीचा देशाच्या शत्रूंमध्ये समावेश होणे निंदनीय, घृणास्पद आणि असह्य असल्याचे उपराष्ट्रपती धनखड यांनी म्हटले आहे. संसद भवन संकुलातील राज्यसभा सचिवालयात इंटर्नशिप करणाऱ्या विद्यार्थ्यांना संबोधित करताना धनखड बोलत होते. दरम्यान ही टीका राहुल गांधी यांना उद्देशून असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी तीन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर होते. यादरम्यान त्यांनी अनेक आक्षेपार्ह विधाने केलीत. यावेळी राहुल म्हणाले की, पंतप्रधान संविधानावर आघात करत असल्याचे भारतातील कोट्यवधी जनतेला निवडणुकीतून स्पष्टपणे कळले. तसेच त्यांनी शिख समुदायाच्या संदर्भात दिशाभूल करणारी विधाने केली. त्यासोबतच आरक्षण विरोधी वक्तव्य केल्याने राहुल गांधींविरोधात भाजपसह विविध राजकीय पक्षांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. यापार्श्वभूमीवर कुणाचेही नाव न घेता उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी जोरदार टीका केली. धनखड म्हणाले की, महत्त्वाच्या पदांवर असलेल्या काही लोकांना राष्ट्रहिताची माहिती नाही. घटनात्मक पदावर असलेल्या व्यक्तीने देशाच्या शत्रूंशी हातमिळवणी करणे हे निंदनीय, घृणास्पद आणि असह्य असल्याचे उपराष्ट्रपती म्हणाले. तसेच देशाच्या शत्रूंसोबत सामील होण्यापेक्षा निंदनीय, घृणास्पद आणि असह्य दुसरे काहीही असू शकत नाही. अशा लोकांना स्वातंत्र्याची किंमत कळत नाही. या देशाची सभ्यता 5 हजार वर्षे जुनी आहे हे त्यांना समजत नाही. मला दु:ख आणि वेदना होत आहेत की काही महत्त्वाच्या पदांवर असलेल्या लोकांना राष्ट्रहिताचे ज्ञान नसल्याची खंत धनखड यांनी व्यक्त केली.

यासोबतच महत्त्वाच्या पदांवर असलेल्या काही लोकांना भारताबद्दल काहीच माहिती नसल्यामुळे मी दु:खी आणि अस्वस्थ आहे. त्यांना ना आमच्या राज्यघटनेची माहिती आहे ना त्यांना राष्ट्रहिताची. हे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी या स्वातंत्र्याचे रक्षण करण्यासाठी आणि या देशाचे रक्षण करण्यासाठी लोकांनी सर्वोच्च बलिदान दिले आहे हे नेहमी लक्षात ठेवले पाहिजे. आमचे बंधू-भगिनी देशाच्या रक्षणासाठी पूर्णपणे तयार आहेत. मातांनी आपले मुलगे गमावले, पत्नींनी त्यांचे पती गमावले. आपण आपल्या राष्ट्रवादाची चेष्टा करू शकत नाही. प्रत्येक भारतीयाला देशाबाहेर राष्ट्राचे राजदूत व्हावे लागेल असेही धनखड यांनी सांगितले.

----------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande