मुंबई, 12 सप्टेंबर (हिं.स.)।
13 सप्टेंबर रोजी अमिताभ बच्चन यांचे सूत्रसंचालन लाभलेल्या कौन बनेगा करोडपती सीझन 16 या गेमशोमध्ये पद्मश्री विजेते डॉ. अभय आणि डॉ. रानी बंग यांचा सत्कार करण्यात येणार आहे. हे दोन्ही असामान्य कर्मवीर हॉटसीटवर विराजमान झालेले असतील आणि महाराष्ट्राच्या गडचिरोलीतील आदिवासी भागात हेल्थकेअर क्षेत्रात क्रांती घडवणाऱ्या या दांपत्याचे होस्ट अमिताभ बच्चन तोंड भारून कौतुक करताना दिसतील. “थिंक ग्लोबली, अॅक्ट लोकली’ या तत्वज्ञानाने प्रेरित होऊन या दांपत्याने मा दंतेश्वरी हॉस्पिटलची स्थापना केली आहे. या हॉस्पिटलमध्ये आधुनिक औषधे येथील समुदायास अनुकूल होतील, अशा पद्धतीने देण्यात येतात व आदिवासी परंपरांचे जतन केले जाते.
त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीचे कौतुक करताना आणि त्यांना शुभेच्छा देताना अमिताभ बच्चन म्हणाले, “माझी इच्छा आहे की कौन बनेगा करोडपती मधून तुम्ही भरघोस रक्कम जिंकावी. तुमच्या बोलण्यावरून हे स्पष्ट आहे की, या रकमेचा उपयोग तुम्ही आपले हे उदात्त काम चालू ठेवण्यासाठी आणि रुग्णांना विनामूल्य उपचार प्रदान करण्यासाठी वापरणार आहात.”
होस्ट अमिताभ बच्चन यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारताना अभय बंग यांनी सांगितले की, त्यांना आपली पत्नी रानी हिने बनवलेले जेवण खूप आवडते, विशेषतः तिने बनवलेला मसाला डोसा त्यांना अती प्रिय आहे. त्यावर बिग बींनी सुद्धा कबूल केले की, “मलाही फारच आवडतो, मसाला डोसा.” रानी गंमतीने पुस्ती जोडत म्हणाल्या, अभयसाठी ती सगळे जेवण बनवते, पण अभय मात्र तिच्यासाठी फक्त चहाच करतो. हे ऐकून अमिताभ बच्चन यांना मनापासून हसू फुटले. अभय बंग यांनी ओशाळे होत कबूल केले की त्यांना त्याशिवाय दुसरे काहीच बनवता येत नाही. त्यांना साथ देत अमिताभ बच्चन यांनी तर सांगून टाकले की, त्यांचे पाककलेचे ज्ञान तर फक्त पाणी उकळण्यापर्यंतच सीमित आहे.
डॉ. अभय आणि डॉ. रानी बंग यांची आरोग्य सेवेच्याप्रति असलेली अढळ निष्ठा आणि त्यांचा दूरदर्शी दृष्टीकोन हे अथक प्रयत्न सामाजिक बदल कसा संभव करू शकतात, याचे जिवंत उदाहरण आहे. अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या समुदायात सामील होण्यासाठी उपस्थित प्रेक्षकांना आवाहन केले. डॉ. बंग यांनी सामाजिक योगदान देण्यासाठी उत्सुक असलेल्यांना आमंत्रित केले आणि हे भारपूर्वक सांगितले की, समाजासाठी योगदान देण्यात वेचलेला प्रत्येक क्षण एका अर्थपूर्ण आणि स्थायी बदलासाठी सत्कारणी लागत असतो.
अमिताभ बच्चन यांना आमंत्रित पाहुण्यांशी दिलखुलास गप्पा मारताना बघा, 13 सप्टेंबर रोजी रात्री 9 वाजता कौन बनेगा करोडपती – सीझन 16 मध्ये, फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर!
हिंदुस्थान समाचार / मेघा माने