पुणे फेस्टिव्हलमध्ये ‘गाणी बाबूजी-गदिमांची’ सादर
पुणे, 16 सप्टेंबर (हिं.स.)। ‘राम जन्मला ग सखी’... ‘कानडा राजा पंढरीचा’.... ‘तोच चंद्रमा नभात’.. ‘धुंदी कळ्यांना’... ‘सखी मंद झाल्या’.. ‘का रे दुरावा’... ‘हृदयी प्रीत जागते’.. ‘प्रथम तुज पाहता’.. अशी एका पेक्षा एक सरस बाबूजींची अवीट गोडीची गाणी आ
गाणी बाबूजी गदिमांची


पुणे, 16 सप्टेंबर (हिं.स.)।

‘राम जन्मला ग सखी’... ‘कानडा राजा पंढरीचा’.... ‘तोच चंद्रमा नभात’.. ‘धुंदी कळ्यांना’... ‘सखी मंद झाल्या’.. ‘का रे दुरावा’... ‘हृदयी प्रीत जागते’.. ‘प्रथम तुज पाहता’.. अशी एका पेक्षा एक सरस बाबूजींची अवीट गोडीची गाणी आणि गदिमांच्या अलौकिक प्रतिभेची झलक दाखवणारा गाणी बाबूजी गदिमांची हा कार्यक्रम ३६व्या पुणे फेस्टिवल अंतर्गत बालगंधर्व रंगमंदिर येथे संपन्न झाला. स्वरोमा म्युझिकल इवेंट्स आणि नवचैतन्य हास्य योग परिवार प्रस्तुत या कार्यक्रमामुळे उपस्थित ज्येष्ठ नागरिकांना आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देता आला. महाकवि स्व. गजानन दिगंबर माडगूळकर आणि महान संगीतकार व गायक स्व. सुधीर फडके म्हणजेच महाराष्ट्राचे लाडके गदिमा आणि बाबूजी म्हणजे जणू सूर आणि शब्दांचे अतूट नाते ज्यांनी मराठी मनावर राज्य केलं. या द्वयीने अजरामर केलेली गीते सुप्रसिद्ध आणि आजचा आघाडीचा युवा गायक हृषिकेश रानडे, राजेश दातार, स्वरोमाच्या संस्थापिका आणि गायिका अनुपमा कुलकर्णी, प्रज्ञा देशपांडे आणि ज्यांना खुद्द श्रीधर फडके यांनी प्रति बाबूजी ही उपमा दिली ते जेष्ठ गायक गिरीश पंचवाडकर यांनी तेवढ्याच ताकदीने सादर करून रसिकांची वाहवा मिळवली.

गायकांना हार्मोनियमवर प्रसन्न बाम, तबल्यावर अभिजित जायदे, सिंथेसायजरवर अमन सय्यद आणि रशीद शेख, ऱ्हिदम मशीन आणि ढोलकीवर रोहित साने यांनी तेवढ्याच ताकदीने साथसंगत केली. सिद्धार्थ बेंद्रे यांच्या ओघवत्या आणि रसाळ शैलीतील निवेदनाने कार्यक्रमाची रंगत उत्तरोत्तर वाढत गेली. कार्यक्रमाची संकल्पना आणि संयोजन करुणा पाटील यांचे होते. कार्यक्रमास बांधकाम व्यावसायिक प्रसाद देशपांडे, नवचैतन्य हास्ययोग परिवाराचे संस्थापक विठ्ठल काटे, समन्वयक मकरंद टिल्लू, गदिमांच्या नात वेदवती उरणकर, श्री महिला गृह उद्योग लिज्जत पापडचे सुरेश कोते, चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले, लेखक प्रा. श्याम भुर्के, हॉटेल व्यवसायिक प्रवीण तरवडे, योगगुरु डॉ. एकनाथ आलतेकर उपस्थित होते. कार्यक्रमाला देशपांडे रियल्टी प्रायोजक म्हणून लाभले होते. मिडास टच इन्स्टिट्यूटच्या डॉ. अंजली जोशी यांचे विशेष सहकार्य होते. याप्रसंगी पुणे फेस्टिव्हलचे उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल, मुख्य समन्वयक अॅड. अभय छाजेड आणि मोहन टिल्लू यांनी कलाकारांचे सत्कार केले.

३६व्या ‘पुणे फेस्टिव्हल’चे महाराष्ट्र पर्यटन विभागाचे पर्यटन संचालनालय आणि कोहिनूर ग्रुप हे मुख्य प्रायोजक असून, पंचशील, सुमा शिल्प लि., भारत फोर्ज आणि नॅशनल एग्ज को–ऑर्डिनेशन कमिटी हे सहप्रायोजक आहेत. डॉ. डी. वाय. पाटील युनिव्हर्सिटी, बढेकर ग्रुप,अहुरा बिल्डर्स आणि सिंहगड इन्स्टिट्यूट हे उपप्रायोजक आहेत.

हिंदुस्थान समाचार / मेघा माने


 rajesh pande