नाशिक : लतादीदींच्या गाजलेल्या गीतांनी रसिक श्रोते मंत्रमुग्ध
नाशिक , 19 सप्टेंबर (हिं.स.)। महान पार्श्वगायिका भारतरत्न लतादीदी आपल्यातून जाऊन २ वर्षे होऊन गेली असली तरी त्यांचे अजरामर सूर कायमच आपल्यासोबत असतात. आजही त्यांची सुरेल गाणी कानावर पडताच प्रत्येकजण तल्लीन होतो. काल अशाच काही अफलातून गीतांनी नाशिकक
नाशिक : लतादीदींच्या गाजलेल्या गीतांनी रसिक श्रोते मंत्रमुग्ध


नाशिक , 19 सप्टेंबर (हिं.स.)।

महान पार्श्वगायिका भारतरत्न लतादीदी आपल्यातून जाऊन २ वर्षे होऊन गेली असली तरी त्यांचे अजरामर सूर कायमच आपल्यासोबत असतात. आजही त्यांची सुरेल गाणी कानावर पडताच प्रत्येकजण तल्लीन होतो. काल अशाच काही अफलातून गीतांनी नाशिककर रसिक श्रोते मंत्रमुग्ध झाले.

लता मंगेशकर यांच्या २८ सप्टेंबर रोजी असलेल्या जयंतीनिमित्त शिवरंजनी म्युझिकल स्टुडिओ व अफलातून म्युझिक लव्हर्स यांच्या संयुक्त विद्यमाने 'गॉडेस सिंगर - लता मंगेशकर' या मैफलीचे आयोजन करण्यात आले. विविधरंगी लोकप्रिय हिंदी चित्रपटगीतांचा हा विनामूल्य कार्यक्रम प.सा. नाट्यगृह येथे झाला.

जागो मोहन प्यारे या गाण्याने मैफलीचा प्रारंभ झाला. धीरे धीरे मचल..., बिंदिया चमके गी...,तेरा मेरा प्यार अमर...,पंख होते तो..., तुझे जीवन की डोर से..., ठंडी हवाए..., रहे ना रहे हम...,तुम मुझे युं भुला ना पाओगे... या व अशा ३५ गाण्यांना रसिकांचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला. प्रमुख पाहुणे म्हणून अफलातून म्युझिक लव्हर्सचे अध्यक्ष हरीशभाई ठक्कर, उपायुक्त मयूर पाटील उपस्थित होते. यावेळी प्रकाश गोसावी यांचे विशेष सहकार्य लाभले.

या कार्यक्रमात नाशिकमधील सुप्रसिद्ध गायिका वर्षा संगम, सुवर्णा भारंबे, पौर्णिमा गुप्ता, आरती ओक, स्वाती भागवत, सुषमा दौंडे यांनी लतादीदींची गाजलेली गाणी सादर केली. त्यांना कैलास कपाटे, सतीश रणदिवे, सारंग हुदलीकर, चंद्रकांत महाले या गायकांनी सुरेल साथ केली. उमेश मालवी, श्याम जाधव, दिलीप पवार, जयंत तोडकर, अभिलाशा पाटील हे पाहुणे गायक लाभले. त्यांनीही लतादीदींच्या गाण्यांमध्ये रंग भरले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गिरीश ठक्कर व सुनील एकार यांनी करतांना अनेक अविस्मरणीय प्रसंग सांगून आठवणींना उजाळा दिला. ध्वनीसंयोजन पवन वंजारी यांनी केले. शिवरंजनी म्युझिकल स्टुडिओचे अध्यक्ष राजेंद्र भुजबळ यांनी आभार मानले.

हिंदुस्थान समाचार / CHANDRASHEKHAR SUKHDEV GOSAVI


 rajesh pande