जळगाव, , 4 सप्टेंबर (हिं.स.) जळगाव येथील भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या जळगाव शाखेत खळबळ उडाली आहे. पतसंस्थेचा अवसायक चैतन्य नासरे यांच्यासह वसुली अधिकाऱ्याला दीड लाखांची लाच घेताना अटक करण्यात आले आहे.
जळगाव येथील बीएचआर मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या मुख्य कार्यालयातील अवसायक व वसुली अधिकारी यांना कर्जदाराकडून दीड लाख रुपयांची लाच स्वीकारताना नाशिक अँटीकरप्शन ब्युरो विभागाने रंगेहात पकडले. बीएचआर मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी मधून 43 वर्षीय तक्रारदार याची आई व मोठ्या भावाने कर्ज घेतले होते. या कर्जाचे नियमित हप्तेही ते फेडत होते. भाऊ व आई यांच्याकडे थकीत असलेले कर्जाचे हप्ते बाकी आहे. त्याचे वन टाइम सेटलमेंटसाठी किती पैसे भरावे लागतील याची चौकशी करण्यासाठी बीएचआरच्या जळगांव मुख्य कार्यालयात आल्यानंतर वसुली अधिकारी सुनील गोपीचंद पाटील यांनी थकीत कर्ज व वसूल करावयाच्या मुद्दल कर्ज रकमेच्या पाच टक्के रक्कम भरण्याची अवसायक चैतन्य नासरे यांच्याकडून परवानगी देण्याच्या मोबदल्यात दोघांसाठी दिड लाख रुपयांची लाच १४ ऑगस्ट रोजी मागितली होती. यामध्ये कोणतीही तडजोड होणार नाही असेही बजावले होते. दरम्यान संशयित आरोपी अवसायक चैतन्य हरिभाऊ नासरे (वय ५७, मूळ रा. गांधीनगर, नागपूर) यांनी लाच रक्कम संशयित आरोपी सुनील गोपीचंद पाटील (वय ५४, रा. गुजराल पेट्रोल पंप जवळ, जळगाव) यांच्याकडे सुपूर्द करण्यास सांगितल्यानंतर मंगळवारी सायंकाळी तक्रारदाराने रक्कम दिली व लागलीच एसीबीने दोघांना अटक केली.
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर