डॉ. हिम्मतराव बावसकर.. 'एक कर्मयोगी संशोधक'
पद्मश्री डॉ.हिम्मतराव बावस्कर यांना त्यांच्या सार्वजनिक आरोग्य व संशोधन क्षेत्रातील महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल सन २०२३ चा ‘चिरमुले पुरस्कार’ देऊन गौरविण्याचे ठरविले आहे.पुरस्कार बुधवार दि.१५.०१.२०२५ रोजी संध्याकाळी ५ वा. धनंजयराव गाडगीळ महाविद्यालयाच्
डॉ. हिम्मतराव बावसकर


पद्मश्री डॉ.हिम्मतराव बावस्कर यांना त्यांच्या सार्वजनिक आरोग्य व संशोधन क्षेत्रातील महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल सन २०२३ चा ‘चिरमुले पुरस्कार’ देऊन गौरविण्याचे ठरविले आहे.पुरस्कार बुधवार दि.१५.०१.२०२५ रोजी संध्याकाळी ५ वा. धनंजयराव गाडगीळ महाविद्यालयाच्या कै. लक्ष्मीबाई भाऊराव पाटील सभागृहात, जेष्ठ डॉ. शरद अभ्यंकर यांच्या शुभहस्ते पुरस्कार डॉ..ज्ञानदेव म्हस्के - व्हाईस चान्सेलर, कर्मवीर भाऊराव पाटील यूनिवर्सिटी, सातारा यांचे अध्यक्षतेखाली व विकास देशमुख-सचिव रयत शिक्षण संस्था, सातारा यांचे उपस्थितीत आयोजित केला आहे. डॉ.हिम्मतराव बावस्कर हे विख्यात वैद्यकीय संशोधक आहेत. ते विंचू विषबाधेच्या उपचारांवरील संशोधनासाठी प्रसिद्ध आहेत. यानिमित्त त्यांच्यावर लिहिलेला हा विशेष लेख.

कर्तव्य, रुग्णोपचार, ज्ञानसंवर्धन व संशोधन हे जीवनसूत्र असणारे व्यक्तीमत्व ! जिद्दी, कष्टाळू आई रखमाबाई व सहृदयी, सज्जन साळुबा यांचे चिरंजीव. कुटुंबात थोरला भाऊ व ३ बहिणी जालना जिल्हयातील भोकरदन तालुक्यातील देहेड या गावी घरीच जन्म, कारण दवाखाने नव्हते. घरची गरिबी तर आईचे माहेर श्रीमंत पण तिने संसार कष्टाने विना तक्रार फुलवला. अशिक्षित व गरीब शेतकरी कुटुंबात जन्म झाल्यामुळे शारिरिक कष्ट करावे लागले. पण मेंदू तल्लख व हुशारीमुळे शिक्षणात उत्तम प्रगती. आजोबा व मातापित्यांनी शिक्षणाचे महत्त्व ओळखून दोन्ही मुलांना उच्चशिक्षित करण्यासाठी प्रचंड योगदान दिले. वडिलांनी जिद्द दाखवल्यावर गावातील लोक त्यांना बॅरिस्टर म्हणुन चिडवत व ह्या मुलांना बॅरिस्टरचा कार्ट म्हणत, म्हणून डॉ. हिम्मतरावांनी आपल्या सन २००५ साली प्रसिध्द केलेल्या आत्मचरित्राचे नावही 'बॅरिस्टरचं कार्ट' असेच ठेवले. यामध्ये त्रयस्थ वृत्तीने स्वतःचे आत्मपरिक्षण करीत स्पष्ट शब्दात जीवनप्रवास लिहीला आहे.

बुलढाण्यात शालेय, खामगावला कॉलेज व नागपुरला मेडिकलचे शिक्षण घेतले. कॉलेजमध्ये ते सतत अव्वल नंबर कमवित. मुळातच हुशार असलेमुळे शिक्षणात कोठे बुध्दीची अडचण आली नाही. आर्थिक अडचण भरपूर पण लाकडे गोळा करणे, फोडणे, टेंभुर्णीची पाने गोळा करणे, शालेय वेळेव्यतिरीक्त पुस्तक दुकानात व मेडिकल दुकानात काम करणे, वेटरचे काम ही त्यांना करावे लागले. पोटात भूक असली तरी विवेक त्यांनी सोडला नाही. वेटरचे डॉक्टर झाले तरी त्या जीवनाची जाण आयुष्यभर जपली. थोरल्या भावाची मदतही ते कृतज्ञपणे व्यक्त करतात.

स्वतःचा व्यवसाय करणे शक्य होणार नाही. सरकारी नोकरी करणे सोयीस्कर म्हणून MBBS झाल्यावर दि. २१/०८/१९७६ ला बिरवाडी प्राथमिक आरोग्य केंद्र (जि. रायगड) येथे डॉक्टर म्हणून रुजू झाले. तेथे खाजगी प्रॅक्टीस न करता विनामूल्य सेवा देत राहिले त्यामुळे पगाराव्यतिरीक्त उत्पन्न नाही. पण लोकांचे प्रेम व आशीर्वाद भरपूर मिळाले. तेथे विंचू दंशाचे अनेक रुग्ण येत व ठोस उपचार नसल्यामुळे त्यांचा मृत्यू बघण्यापलिकडे काही करता येत नसे यामुळे मुळातील संशोधक वृत्ती प्रेरणादायी ठरली. मृत्यु का व कसा होतो यांची नोंद, दर तासाला होणारी प्रकृतीतील अधोगती याचे टिपण करायला सुरुवात केली. त्याचा अभ्यास व विश्लेषण करतांना कोणते औषध लागू पडेल याचा विचार केला. अनेक जर्नल्स, शोधनिबंध अभ्यासले त्या टिपणांवर अनेकांशी चर्चा केली. मृत्यु हा पलमोनरी इडीमा व रिफॅक्टरी हार्ट फेल्युअर ने होतो हे लक्षात आले. त्यावर जुने अनुभवी डॉक्टर मुंडले, हाफकीन इन्स्टिट्युटचे मुख्य, जे.जे. रुग्णालयाचे मुख्य प्रोफेसर यांच्या बरोबर समक्ष चर्चा व पत्रव्यवहार केला. सोडियम नायट्रोप्रुसाईट इंजेक्शन उपयोगी पडेल अशा निष्कर्शाप्रत आले. काही विंचूदंश झालेल्या रुग्णांवर उपचार केल्यावर उत्तम परिणाम दिसून आला. हे इंजेक्शन डॉक्टर्स, अतिदक्षता विभागाचे पाठबळ असल्याशिवाय सर्वांना वापरणे शक्य नव्हते. पुन्हा अभ्यास, वाचन, पत्रव्यवहार चर्चा करत हाच परिणाम देऊ शकणारी गोळी प्राझोसिन वापरावी या निष्कर्षाप्रत आले. तिचा वापर करताना रुग्णांची अवस्था, तासा तासाची नोंद व प्रगती, येणारे अडथळे याबाबत त्यांचा शोधनिबंध १९७८ ला लॅन्सेट या प्रसिध्द आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये छापून आला. त्यामुळे त्यांच्या प्रयत्नांना मान्यता मिळाली. खेडेगावातील हा डॉक्टर सोयी सुविधा नसताना संशोधन कसे करतो याचे सर्वांना आश्चर्य वाटले पण चिकाटी, अभ्यास, संशोधन व झोकून काम करण्याची जिद्द यामुळे शक्य झाले. विंचू दंशाने होणारे मृत्युचे प्रमाण ४०% वरून १% वर आले. सर्व जगात त्याचा प्रसार झाला, मान्यता मिळाली. भारतात सगळीकडे विचारणा होऊन तामिळनाडू, पोंडीचेरी वगैरे ठिकाणाचे डॉक्टर त्यांचे मार्गदर्शन घेऊ लागले.

हे प्रयत्न चालू असताना नुसतेच MBBS पेक्षा सखोल ज्ञान मिळवण्यासाठी औंध (पुणे) येथे राहुन बी. जे. मेडीकल कॉलेजमधून त्यांनी M.D. (Medicine) ह्या परिक्षेत प्रथम प्रयत्नात उत्तम यश मिळवले. विंचवाचे विषाची तीव्रता वेगवेगळ्या भागात वेगवेगळी असते. त्याचप्रमाणे विंचवाने २-३ वेळा दंश केला तर १ ला दंश तीव्र असतो व नंतर तीव्रता कमी होत जाते. १९८१ ला एम.बी.बी.एस. झालेनंतर डॉक्टरांना मानसिक वैफल्यग्रस्ताने ग्रासले. मानसोपाचार तज्ञांकडून उपचार करुन घ्यावे लागले. त्यांचे सहकारी त्यांना एक विक्षीप्त डॉक्टर म्हणु लागले. आई वडिलांना वाटू लागले एवढे कष्ट करून शिकवले पण काही उपयोग नाही. त्यावेळी त्यांचे थोरले भाऊ भगवान यांनी त्यांना संपूर्ण सहकार्य करून बरे होण्यास बळ दिले. त्यामुळे ते नोकरी, एम.डी. व संशोधन करु शकले. प्रत्येक यशस्वी पुरुषा मागे पत्नीचे मोठे योगदान असते हे खरे आहे. त्यांनी लग्न ठरवतानाच अंबोजोगाईचे भोसले कुटुंबातील MBBS मुलगी निवडली तिला सर्व कल्पनादिली. दि.२१/०३/१९८२ ला सुविद्य पत्नी सौ. प्रमोदिनी यांचेशी विवाह झाला. त्यांनी साथ दिल्यामुळेच डॉक्टर सर्व कार्य करू शकले. सौ. वहिनींनाही सामान्य गृहिणीप्रमाणे कष्टाची आवड व सवय होती. त्यांनी घर सांभाळले दोन्ही मुले पंकज व पराग सुसंस्कृत व जबाबदार नागरिक बनवले. फार अपेक्षा न ठेवता समाधानाने संसार केला. हॉस्पिटलला सर्व सहकार्य केले. खरोखरच त्या माऊलीला धन्यवाद द्यावेत तेवढे थोडेच आहेत. मुलगा पंकज हा B.Sc तर पराग हा डॉक्टर झाला. १९८७ ला सरकारी नोकरी सोडल्यावर महाड मध्ये राहाण्याचे ठरवले व तेथे हॉस्पिटल सुरु केले.

वैद्यकीय व्यवसाय करताना, संशोधन करताना, सरकारी नोकरी करताना त्यांना अनेक चांगले वाईट अनुभव आले. निरपेक्ष काम व भ्रष्टाचार नाही त्यामुळे त्यांच्याविरूध्द तक्रारीही झाल्या. पैसै कमी मिळवत असल्यामुळे नातेवाईकांची अपेक्षा पुरी करू न शकल्यामुळे गैरसमजही झाले.

विंचूदंशा शिवाय डॉक्टरांनी सर्पदंश, हायपोथॉयरॉडीझम, व्यसनमुक्ती, एडस समुपदेशन वगैरे विषयातही कार्य केले. Scorpion sting हे पुस्तक लिहिले. त्यांचे संशोधनाबाबत Satoskar Pharmacology व Oxford Text book of Medicine. या प्रसिध्द पुस्तकांमध्ये लेख घेतले गेले. त्यांच्या या कार्यामुळे त्यांना २०२२ साली भारत सरकारने पद्मश्री या पुरस्काराने गौरविले.स्वतःचे आजारपणातही त्यांनी स्वतःची दुर्लक्षित रुग्ण अशी संभावना केली. पण वैज्ञानिक पध्दतीने प्रत्येक आजार व उपचार याबाबत स्वतःचे परखडपणे चिंतन केले. त्यांना वैद्यकीय शिक्षण व व्यवसायातील भ्रष्टाचाराबदल प्रचंड चीड आहे.

वाया गेलेला, मानसोपचार घेतलेला, पण हुशार विद्यार्थी आयुष्यात वेगळी वाट शोधत राहिला अन त्यात यशस्वी झाला. सतत वाचन, ज्ञानसंवर्धन, संशोधनाचा विचार यामुळे हिम्मतराव हे नाव सार्थकी झाले. या सर्व संशोधन कार्यात त्यांना कोणत्याही संस्थांची वा कोणत्याही प्रकारची शासकीय मदत मिळाली नाही. अनेक पुरस्कार मिळाले. १२३ चेवर संशोधनपर लेख प्रसिध्द झाले. त्यांचा चिरमुले ट्रस्टतर्फे पुरस्कार देऊन गौरव होत आहे याचा आनंद वाटतो. हा त्यांचे कार्याला सलाम आहे.

पद्मश्री डॉ. बावसकरांचे विचार..

तळागाळातील गरीबांमध्ये जीवनमुल्ये शिल्लक आहेत अन सुशिक्षित हरामखोर होत आहेत.

सर्वांना कर्तव्याचे व्यसन असू दे.

संस्कृती ही घराघरात जन्माला येते.

निसर्गा विरुध्द विज्ञान थोडीफार झेप घेऊ शकते. परंतु निसर्गावर ताबा मिळवणे शक्य नाही.

आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाल्यावर भारतीय लोक कौतुक करतात तोपर्यंत कुचेष्टाही सहन करावी लागते. भारतीय संशोधकांच्या अवस्थेबद्दल काळजी वाटते.

जोपर्यंत शिक्षक हे स्वतंत्र विचार राबवण्याचे नीतीधैर्य निर्माण करु शकत नाहीत तोपर्यंत सुजाण विद्यार्थी तयार होणार नाहीत.

Doctor is student till Death.

रुग्ण हा तीर्थक्षेत्र आहे व त्याला तपासणे म्हणजे वारी आहे.

देह देवाचे मंदिर, रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा.

हिंदुस्थान समाचार / मेघा माने


 rajesh pande