खासदार निलेश लंके आणि शोभा बच्छाव यांनी व्यक्त केल्या भावना
नवी दिल्ली, 17 जानेवारी (हिं.स.)
: मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त ग्रंथ विक्री प्रदर्शनाचे आयोजन स्तुत्य उपक्रम असल्याच्या भावना ग्रंथ विक्री प्रदर्शन उद्घाटनप्रसंगी लोकसभा खासदार निलेश लंके आणि शोभा बच्छाव यांनी व्यक्त केल्या.
कस्तुरबा गांधी मार्गस्थित महाराष्ट्र सदन येथे निवासी आयुक्त कार्यालय, महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र परिचय केंद्राच्या संयुक्त विद्यमाने ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ साजरा करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून पुस्तक विक्री प्रदर्शन हा उपक्रम राबविण्यात आला आहे. पुस्तक विक्री प्रदर्शनाचे हे तिसरे वर्ष आहे.
या पुस्तक विक्री प्रदर्शनाचे उद्घाटन खासदार निलेश लंके आणि शोभा बच्छाव यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रंसगी सदनच्या निवासी आयुक्त निवा जैन, सहायक निवासी आयुक्त स्मिता शेलार, महाराष्ट्र परिचय केंद्राच्या उपसंचालक अमरज्योत कौर अरोरा, माहिती अधिकारी अंजु निमसरकर, महाराष्ट्र सदनच्या व्यवस्थापक भावना मेश्राम यांच्यासह महाराष्ट्र सदन आणि परिचय केंद्राचे अधिकारी कर्मचारी आणि सदनातील अभ्यागत याप्रसंगी उपस्थित होते.
उभय खासदारांनी महाराष्ट्र शासनाचा मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त आयोजित कार्यक्रमाचे कौतुक करून राजधानी दिल्लीत असणाऱ्या मराठी माणसांसाठी पुस्तक खरेदीची चांगली संधी उपलब्ध करून दिली असल्याचे मनोगत व्यक्त केले. अधिकाधिक मराठी भाषिक लोकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन ही त्यांनी यावेळी केले.
या ग्रंथ प्रदर्शनात राष्ट्रीय पुस्तक न्यास (एनबीटी), साहित्य अकादमी, पॉप्युलर प्रकाशन, मुळ मराठी भुमिपुत्र मात्र दिल्ली हिंदी साहित्य वर्तुळात नावाजलेले लेख आणि प्रकाशक लक्ष्मण राव यांचे भारतीय साहित्य कला प्रकाशन यांचेही पुस्तक विक्री येथे मांडण्यात आले आहे.
भारतीय साहित्य, संस्कृती, अर्थविषयक, राजकीय, ऐतिहासिक, वैचारिक अशा विविध विषयांवर आधारित सुप्रसिद्ध लेखकांसह, नवोदित लेखकांची पुस्तके मांडण्यात आली आहेत. पुढील दोन दिवस (18 आणि 19) सकाळी १० ते सांयकाळी ७ पर्यंत हे ग्रंथ विक्री प्रदर्शन राहणार आहे. राजधानीतील मराठी लोकांनी या ग्रंथ प्रदर्शनास भेट द्यावी, असे आवाहन महाराष्ट्र सदन आणि परिचय केंद्राकडून करण्यात येत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी