घटनेची न्यायिक आयोग करणार चौकशी
मृतांच्या वारसांना प्रत्येकी 25 लाख देणार
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची घोषणा
प्रयागराज, 29 जानेवारी (हिं.स.) : उत्तरप्रदेशच्या प्रयागराज येथे आयोजित महाकुंभ मेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीत 30 जणांचा मृत्यू झाला असून 60 जण जखमी असल्याची अधिकृत माहिती उत्तरप्रदेश प्रशासनाने दिली. या घटनेची न्यायिक आयोगामार्फत चौकशी होणार असून मृतकांचा वारसांना प्रत्येकी 25 लाख रुपयांची मदत दिली जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केलीय.
यासंदर्भातील माहितीनुसार मौनी अमावस्येच्या स्नानानिमित्त संगम नाक्यावर झालेल्या अपघाताची चौकशी करण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने माजी न्यायाधीश हर्ष कुमार यांच्या अध्यक्षतेखाली 3 सदस्यीय न्यायालयीन चौकशी आयोग स्थापन केला आहे. पोलिस अपघाताची चौकशी करणार असून राज्याचे मुख्य सचिव आणि पोलिस महासंचालक उद्या, गुरुवारी घटनास्थळाला भेट देतील. तसेच मृतांच्या वारसांना राज्य सरकार प्रत्येकी 25 लाख रुपयांची आर्थिक मदत देईल. महाकुंभात झालेल्या चेंगराचेंगरीत 30 जणांच्या मृत्युबद्दल उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, “ही घटना अत्यंत दुःखद आहे, या घटनेची सखोल सखोल चौकशी केली जाईल. या घटनेमागील कारणे काय होती हे शोधण्यासाठी पोलिस पातळीवर स्वतंत्रपणे चौकशी होईल. मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 25 लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल. न्यायिक आयोग संपूर्ण प्रकरणाची चौकशी करेल आणि वेळेत राज्य सरकारला अहवाल सादर करेल असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.या अपघाताच्या चौकशीसाठी स्थापन करण्यात आलेल्या तीन सदस्यीय न्यायिक आयोगाचे अध्यक्ष माजी न्यायाधीश हर्ष कुमार यांना बनवण्यात आले आहे. माजी डीजीपी व्ही.के. गुप्ता आणि निवृत्त आयएएस बी.के. सिंग हे आयोगाचे सदस्य आहेत. न्यायिक आयोग संपूर्ण प्रकरणाची चौकशी करेल आणि वेळेत राज्य सरकारला आपला अहवाल सादर करेल.
दरम्यान या अपघातानंतर कुंभ मेळ्याचे अधिकारी विजय किरण आनंद आणि डीआयजी वैभव कृष्णा यांनी आज, बुधवारी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी डीआयजी वैभव कृष्णा म्हणाले की, गर्दीच्या दबावामुळे बॅरिकेड्स तुटल्याने ही घटना घडली. धावत्या भक्तांच्या पायाखाली जमिनीवर पडलेले भाविक चिरडले गेले. या अपघातात 90 भाविक जखमी झाले होते. त्यापैकी 30 भाविकांचा मृत्यू झाला असून 25 मृतांची ओळख पटली आहे. उर्वरित 5 जणांची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. घटनेतील 24 जखमींना घरी पाठवण्यात आले असून 36 जणांवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मेळा अधिकारी विजय किरण आनंद म्हणाले की, आज कोणताही व्हीव्हीआयपी किंवा व्हीआयपी प्रोटोकॉल नव्हता. आज कोणत्याही व्हीआयपी वाहनाला प्रवेश नव्हता. तसेच भविष्यातही अमृत स्नानाच्या उत्सवात कोणताही व्हीआयपी प्रोटोकॉल असणार नाही. जखमींना ग्रीन कॉरिडॉर तयार करून रुग्णालयात नेण्यात आल्याचे न्यायाधिकरणाच्या अधिकाऱ्याने सांगितले. मृत आणि जखमींची माहिती मिळावी यासाठी मेळा प्रशासनाने 1920 हा हेल्पलाइन क्रमांक जारी केल्याचे त्यांनी सांगितले.
------------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी