अकोला, 9 जानेवारी (हिं.स.)।अकोल्याच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून दुचाकी वाहनांसाठी क्रमांकांची नवी मालिका सुरू करण्यात येत आहे. दुचाकी वाहनांसाठी नियमित व चारचाकीसाठी विहितपेक्षा तीनपट शुल्क भरल्यास आकर्षक क्रमांक मिळू शकतील. यासंबंधी लिलाव प्रक्रियेत भाग घेण्यासाठी इच्छूकांकडून दि. 13 जानेवारी रोजी अर्ज मागविण्यात आले आहेत.
इच्छूकांनी दि. 13 जानेवारी रोजी कार्यालयीन वेळेत सकाळी 10.30 ते दु. 2.30 वा. दरम्यान पसंतीच्या क्रमांकाच्या विहित नमुन्यातील अर्जासह आधारपत्र, रहिवाशी पुरावा, पॅनकार्ड आदींची साक्षांकित प्रत बंद लिफाफ्यात कार्यालयाच्या रोख विभागात जमा कराव्यात.
लिफाफ्यावर मालकाचे नाव, वाहन वर्ग, पसंती क्रमांक व आधार लिंक मोबाईल क्र. नमूद असावा. एका क्रमांकासाठी अधिक अर्ज आल्यास यादी फलकावर लावण्यात येईल. लिलावाचे डीडी दि. 14 जानेवारी रोजी दु. 2.30 पर्यंत स्वीकारले जातील. त्याच दिवशी दु. 4 वाजता उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या दालनात लिलाव होईल.
डीडी आरटीओ, अकोला या नावे राष्ट्रीयकृत, शेड्युल्ड बँकेचा अकोला येथील असावा. लिलावाकरिता आकर्षक क्रमांकासाठी मूळ विहित शुल्काचा एक डीडी व लिलावासंदर्भात जादा रकमेचा दुसरा डीडी असे दोन डीडी आवश्यक राहतील. लिलावाच्या डीडीचे फक्त एकच पाकिट ग्राह्य धरले जाईल.
लिलाव प्रक्रियेत समान रकमेचे डीडी प्राप्त झाल्यास असा क्रमांक अर्जदारांच्या नावाच्या चिठ्ठ्या टाकून निश्चित करण्यात येईल. पसंती क्रमांकाच्या आगाऊ नोंदणीसाठी अकोला प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील पत्ता असलेल्या वाहनधारकांनीच अर्ज करावेत, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी रवींद्र भुयार यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे