छत्रपती संभाजीनगर, 9 जानेवारी (हिं.स.)।प्रशासकीय कामकात गतिमानता येऊन सामान्यांचे जीवन सुकर व्हावे यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या सात कलमी कृती कार्यक्रमाची प्रत्येक शासकीय कार्यालयाने अंमलबजावणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले.
जिल्ह्यात प्रलंबित असलेल्या फेरफार प्रकरणे निकाली काढण्यासाठी १५ रोजी विशेष अदालतींचे आयोजन करण्याचे आदेश यापुर्वीच देण्यात आले आहेत. त्यानुसार याबाबत मंडळ अधिकारीस्तरावर होत असलेल्या तयारीचा आढावा जिल्हाधिकारी स्वामी यांनी घेतला. तसेच प्रलंबित महसूल अपिलांची प्रकरणे निकाली काढण्यासाठीही राबवावयाच्या कार्यपद्धतीबाबत मार्गदर्शन केले.
जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले की, सामान्य जनतेचे जीवन सुकर करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेला सात कलमी कार्यक्रम मुख्यमंत्री महोदयांनी दिला आहे. त्यानुसार प्रत्येक शासकीय कार्यालयात जुन्या रेकॉर्डचे वर्गीकरण करणे, जुनी वाहने साहित्य इ. निर्लेखित करणे, नागरिकांच्या तक्रारींची दखल घेऊन त्यांची निर्गत करणे, कार्यालयातील वातावरण सुसज्ज ठेवणे. स्वच्छता गृहे, पिण्याच्या पाण्याची सोय, अभ्यागतांसाठी सुविधा आदी बाबींवर प्रकर्षाने कामकाज करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी स्वामी यांनी दिले.
हिंदुस्थान समाचार / मेघा माने