कार्यालयीन कामकाजात गतिमानता आणून चांगले वातावरण निर्माण करा – कोल्हापूर जिल्हाधिकारी
कोल्हापूर, 9 जानेवारी (हिं.स.)।शासनाच्या योजना तसेच जनतेच्या हिताचे घेण्यात आलेले निर्णय, शासकीय लाभ गाव पातळीपर्यंत प्रभावीपणे पोहोचण्यासाठी कार्यालयातील कामकाजात गतिमानता आणत चांगले वातावरण निर्माण करा, अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिल्य
कार्यालयीन कामकाजात गतिमानता आणून चांगले वातावरण निर्माण करा – कोल्हापूर जिल्हाधिकारी


कोल्हापूर, 9 जानेवारी (हिं.स.)।शासनाच्या योजना तसेच जनतेच्या हिताचे घेण्यात आलेले निर्णय, शासकीय लाभ गाव पातळीपर्यंत प्रभावीपणे पोहोचण्यासाठी कार्यालयातील कामकाजात गतिमानता आणत चांगले वातावरण निर्माण करा, अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिल्या. प्रत्येक शासकीय योजना, शासकीय लाभ लोकांपर्यंत पोहोचवत असताना कार्यालयीन प्रक्रिया अधिक सुलभ करून नागरिकांकडून येत असलेल्या सूचनांचाही विचार करा. त्या अधिक चांगल्या प्रकारे त्यांच्यापर्यंत कशा पोहोचतील यासाठी प्रत्येक कार्यालयाने नियोजन करा, असे निर्देशही त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील नवीन सभागृहात झालेल्या बैठकी दरम्यान दिले. नुकतेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हास्तरावरील यंत्रणेची बैठक घेऊन पुढील शंभर दिवसांचे नियोजन करण्याबाबच्या सूचना केल्या होत्या.

त्यानुसार जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील जिल्हास्तरावर सर्व अधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व मुख्याधिकारी यांची याबाबत बैठक घेतली.

राज्याच्या सर्वांगिण प्रगतीसाठी पुढील 100 दिवसांचा आराखडा तयार केला जात आहे. या आराखड्यात लोककेंद्रीत योजना, तंत्रज्ञानाच्या उपयोगाने सहजतेने नागरिकांना लाभ मिळणाऱ्या योजना, राज्याला प्रगतीच्या शिखरावर नेणारी कामगिरी यात कोल्हापूर जिल्ह्यातून चांगला सहभाग असावा असे निर्देश देत पुढील 100 दिवसांच्या आराखड्यातून प्रत्येक विभागांनी ठोस कामगिरी करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. याबाबत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी अधिकाऱ्यांना सात कलमी कृती कार्यक्रम सविस्तर सांगितला. यामध्ये आपल्या कार्यालयाचे संकेतस्थळ सुसज्ज करा, माहिती अधिकार कायद्यानुसार मागितली जाईल अशी सर्व माहिती अगोदरच संकेतस्थळावर उपलब्ध करून द्या. संकेतस्थळ सायबरदृष्ट्या सुरक्षित करा. शासकीय कार्यालयांची स्वच्छता करा, अनावश्यक कागदपत्रे काढून टाका, खराब आणि वापरात नसलेली वाहने निर्लेखित करावीत. शासकीय कार्यालयात येणाऱ्या नागरिकांसाठी पिण्याचे पाणी, प्रसाधनगृह स्वच्छ राहतील, हे सुनिश्चित करा. अधिकाऱ्यांच्या अचानक भेटी होतील, त्यावेळी ते स्वच्छ दिसले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

नागरिकांचे दैनंदिन जीवन सुकर व्हावे यासाठी किमान दोन सुधारणा, नाविन्यपूर्ण उपक्रम आपल्या कार्यालयात राबविण्यात यावेत. प्रलंबित कामांची संख्या शून्यावर कशी येईल, याचा प्रयत्न करा. अधिकारी नागरिकांना कधी उपलब्ध असतील याची माहिती फलकावर नमूद करा, अशा सूचना त्यांनी दिल्या.

नागरिकांचे स्थानिक पातळीवर सुटू शकणारे प्रश्न, समस्या तालुका, जिल्हा स्तरावरच सोडवावेत. यासाठी लोकशाही दिन सारखे उपक्रम प्रभावीपणे राबविले जावेत, असेही त्यांनी सांगितले. जिल्ह्यात विविध ठिकाणी गुंतवणुकीसाठी उद्योजक येतात. त्यांना कसलाही आणि कोणाकडूनही त्रास होणार नाही, याची काळजी घ्या. जिल्ह्यातील विविध महत्त्वाच्या कार्यक्रम आणि योजनांना भेटी, तालुका, गाव पातळीवर भेटी, शाळा, अंगणवाडी आणि आरोग्य केंद्रांना भेटी दिल्याच पाहिजेत. यांचे वेळापत्रक निश्चित करण्यात यावे. सात कलमी कार्यक्रमाबाबतच्या सूचनांवर काय कार्यवाही केली याबाबतचा अहवाल व आढावा १५ एप्रिल २०२५ पुर्वी घेतला जाईल, असेही त्यांनी या बैठकीत सांगितले.

कार्यालयातील व परिसरातील स्वच्छता, त्या ठिकाणी उपलब्ध असलेले प्रसाधनगृहाची स्वच्छता तसेच मुबलक विजेची व्यवस्था आहे का नाही याची पडताळणी करून ते तातडीने दुरुस्त करावेत अशा सूचना यावेळी देण्यात आल्या. प्रत्येक कार्यालयात आलेल्या नागरिकांसाठी बसण्याची व्यवस्थाही चांगल्या प्रकारे असावी. सर्व कार्यालय प्रमुखांनी प्रत्येक कार्यालयात आलेल्या तक्रारी व अर्ज याबाबतची नोंदवही ठेवून त्याबाबतचा दैनंदिन आढावा घ्यावा. नागरिकांना येणाऱ्या अडचणी बाबत तक्रार करण्यासाठी प्रत्येक कार्यालयात आपले सेवा सरकार या संकेतस्थळाचा क्यूआर कोड दर्शनी भागात लावून याबाबतची प्रक्रिया सुलभ करून द्यावी. सात कलमी कार्यक्रमाबाबत प्रत्येक कार्यालयाने याबाबतचा दैनंदिन अहवाल नोंदवावा. या उपक्रमाची अंमलबजावणी करीत असताना प्रत्येक घटकाचे अगोदरचे छायाचित्र व नंतरचे छायाचित्र अशा प्रकारे फलनिष्पत्ती अहवाल तयार करून तो जिल्हा कार्यालयाला सादर करावा.

येणाऱ्या शुक्रवारपासून कार्यालयीन स्वच्छतेला प्रारंभ

प्रत्येक शासकीय कार्यालयात येणाऱ्या शुक्रवारपासून दोन तास स्वच्छतेसाठी या उपक्रमांतर्गत शुक्रवारी सायंकाळी एक तास कार्यालयीन स्वच्छतेसाठी देण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक सोमवारी सकाळी एक तास कार्यालय परिसरातील स्वच्छतेसाठी देण्यात येणार आहे. यासाठी शासकीय कार्यालयातील सर्व अधिकारी कर्मचारी यांनी स्वतः या स्वच्छता उपक्रमात सहभाग नोंदवून हा उपक्रम यशस्वी करावा अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सर्व विभागांना दिल्या. याचबरोबर सर्व शासकीय कार्यालयांमध्ये प्लास्टिक वापर कमी करून तो पूर्ण बंद करण्यासाठी नियोजन करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

हिंदुस्थान समाचार / मेघा माने


 rajesh pande