कोल्हापूर, 9 जानेवारी (हिं.स.)।जलशक्ती अभियान, जलयुक्त शिवार 2.0 या योजनांमध्ये प्राधान्याने ज्या कामातून भूजल साठा वाढेल अशा कामांचा समावेश करा, अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिल्या. जलयुक्त शिवार, जलशक्ती अभियान आणि गाळमुक्त धरण या अभियानांतर्गत सुरू असलेल्या कामांचा आढावा त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील शिवाजी सभागृहात घेतला.
यावेळी ते म्हणाले, विहिर पुनर्भरण, पाऊस पाणी संकलन तसेच गाळ काढणे अशा कामांचा समावेश केल्याने जमिनीतील पाणी साठा वाढून त्याचा उपयोग लोकांना चांगल्या प्रकारे होईल.
जलयुक्त शिवार अभियान 2.0 अंतर्गत 138 गावांमध्ये 248 कामांचा मुळ आराखड्यात समावेश आहे. एकुण 248 कामांच्या संख्येत विशेष निधीची 52 कामे व अभिसरण इतर निधीतील 196 कामांचा समावेश आहे. यातून 9548.17 स.घ.मी. प्रस्तावित पाणीसाठा निर्माण होणार तर 1833.58 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. सद्यस्थितीत जलयुक्त शिवार अभियान 2.0 अंतर्गत 118 कामे पुर्ण असून 2872 लक्ष रूपये खर्च करण्यात आला आहे. यातील उर्वरीत सर्व कामे जानेवारीच्या अखेर पर्यंत गुणवत्तापुर्वक करून पुर्ण करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिल्या. या कामांबाबत मी स्वत: भेटी देवून कामांची पाहणी करणार असल्याचेही ते यावेळी म्हणाले. प्रत्येक गावांचा पाणी ताळेबंद घेवून योजनेत नवीन गावे पात्रतेनुसार समाविष्ट करा. मागील टंचाईच्या काळातील उपाययोजना राबविलेल्या ठिकाणांचाही यात विचार करा.
गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार अंतर्गत 2023-24 अंतर्गत एकुण 52 कामे हाती घेण्यात आली होती ती पुर्ण करण्यात आल्याची माहिती जलसंधारण अधिकारी यांनी दिली. एकुण 5 लक्ष 38 हजार घनमीटर गाळ काढण्यात आला. यामुळे पुनर्जिवित झालेला पाणीसाठा हा 538 सघमी इतका आहे. यासाठी आत्तापर्यंत 52 लक्ष 57 हजार 654 रूपये इतका खर्च करण्यात आला. चालु व पुढिल अर्थिक वर्षासाठी एकुण नव्याने 46 कामांचा प्रस्ताव मान्यतेसाठी पाठविण्यात आला आहे. तसेच नव्याने 72 कामांचा मागणी प्रस्तावही कार्यालयाकडे प्राप्त असून त्याबाबतही प्रक्रिया सुरू असल्याचे जलसंधारण अधिकारी पवार यांनी सांगितले. नव्याने आलेल्या प्रस्तावांमध्ये अजून वाढ होत असल्यास ती करून घेण्याच्या सूचना यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिल्या.
जलशक्ती अभियानांतर्गत जलसंधारणाची कामे हाती घ्या, वनीकरणाची कामेही प्रत्येक संबंधित विभागाने घ्यावीत, पाऊस पाणी संकलनासाठी विशेष मोहिम राबवा, पाऊस पाणी संकलनासाठी प्रचार प्रसिद्धी मोहिम राबवा तसेच तलावांची स्वच्छता व सुशोभीकरण करा अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी संबंधित सर्व विभागांना दिल्या. गावात शहरात जुन्या व नव्या सर्व घरे, इमारतींना पाऊस पाणी संकलन बसविण्यासाठी प्रक्रिया राबवा. यासाठी कमीत कमी खर्चाचे युनिट तयार करून त्याचा अवलंब करा. शासकीय इमारतींनाही पाऊस पाणी संकलन अनिवार्य करा. पाऊस पाणी संकलन उपाययोजनेबाबत प्रचार प्रसिद्धीसाठी नियोजन करून चांगले व्हिडीओ, छापील साहित्य तयार करा. गावोगावी, शहरांमध्ये पाऊसपाणी संकलन प्रात्यक्षिके दाखवून यामध्ये लोकांचा सहभाग वाढेल यासाठी नियोजन करा, पाणी बचतीसाठी शिक्षण विभागाच्या सहयोगाने शालेयस्तरावर चित्रकला व निबंध स्पर्धाचे आयोजन करा अशा सूचनाही जितल्हाधिकारी यांनी बैठकीत दिल्या.
हिंदुस्थान समाचार / मेघा माने