अमरावती, 9 जानेवारी (हिं.स.)।
शहर पोलीस आयुक्तालयात स्वच्छ व सुंदर पोलीस स्टेशन स्पर्धेत राजापेठ पोलीस स्टेशनने बाजी मारली असून प्रथम क्रमांक पटकाविला तर द्वितीय क्रमांक बडनेरा आणि तृतीय क्रमांक भातकुली पोलीस ठाण्याने पटकावला आहे. पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्या हस्ते तिन्ही ठाणेदारांना प्रशस्तीपत्र व चषक देऊन गौरविण्यात आले.
पोलीस वर्धापन दिनानिमीत्त पोलीस आयुक्तांनी आयुक्तालयातील १० पोलीस स्टेशनची स्पर्धा घेतली होती. यामध्ये पो- लीस ठाण्यातील अभिलेख व मुद्देमाल सुस्थीती, ठाण्यात येणाऱ्या तक्रारदाराला बसण्याची व्यवस्था, महिला कक्ष स्वच्छता व सुस्थीती, स्वच्छता गृहाची सुस्थीती आणि ठाण्यातील परिसराची स्वच्छता व सौंदर्याकरण अशा पाच मुद्यावर स्पर्धा होती आणि त्यासाठी आठ दिवसाची मुदत देण्यात आली होती. या आठ दिवसात १० ठाणेदारांनी आपापल्या ठाण्यातील परिसर स्वच्छ व सौंदर्याकरण करण्याचा प्रयत्न केला. तसेच ठाण्याची रंगरंगोटीसुध्दा करण्यात आली. त्यानंतर संबंधीत अधिकाऱ्यांनी सर्व ठाण्याची पाहणी केली.त्यानंतर पुरस्कार घोषीत केला.पोलीस कवायत मैदान येथे बुधवारी दुपारी आयोजीत कार्यक्रमात पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्या हस्ते तिन्ही ठाणेदारांचे स्वागत करून त्यांना प्रशस्तीप्रत्र व चषक देऊन गौरविण्यात आले. यावेळी पोलीस आयुक्तांसह पोलीस उपायुक्त गणेश शिंदे, सागर पाटील, कल्पना बारवकर, एसीपी शिवाजी बचाटे यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थीत होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी