मुंबई, 11 ऑक्टोबर, (हिं.स.)। मराठी हिंदी चित्रपटसृष्टीत आपलं नाव निर्माण करणारा हरहुन्नरी अभिनेता म्हणजे अतुल परचुरे. बहुआयामी अभिनेता अशी ओळख कमावलेल्या अतुल परचुरे यांनी आपल्या अभिनयाने रसिकप्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले. त्यांच्या अभिनयाचा आणि आठवणींचा स्मृतीगंध आजही रसिकांच्या स्मरणात चिरंतन आहे आणि यापुढे राहील.
त्यांच्या वर्षस्मृती निमित्ताने त्यांच्या आठवणींच्या स्मृतीगंधाला उजाळा देत ‘एक अतुलनीय आठवण’ हा विशेष कार्यक्रम अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषद, जागतिक मराठी नाट्यधर्मी निर्माता संघ आणि अतुलचा मित्रपरिवार यांच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे. मंगळवार, दि. १४ ऑक्टोबर रात्रौ ८.३० वा. यशवंत नाट्यमंदिर, माटुंगा हा कार्यक्रम होणार आहे. दिलीप प्रभावळकर, भरत दाभोळकर ,स्वाती चिटणीस, गिरीश कुबेर आदि मान्यवर या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.
आपल्या उत्कृष्ट अभिनयाने प्रत्येक 'व्यक्ती आणि वल्ली' ह्यांचं आयुष्य अतुल परचुरे यांनी अतिसुंदर केलं! विविध भूमिका त्यांनी अतिशय सहजपणे साकार केल्या. त्याच्या सगळ्या आठवणींना नवा रंग देण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यासोबत 'लाभले आम्हांस भाग्य' ह्या कार्यक्रमाचा काही भाग सादर केला जाईल. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर