रायगड, 12 ऑक्टोबर (हिं.स.)
सामाजिक, शैक्षणिक आणि सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करून आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणारे दिलीप कांबळे यांना गौरव महाराष्ट्राचा राज्यस्तरीय सहकार भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा सन्मान त्यांना मुंबईतील रुक्मिणी पांडुरंग पोटले चॅरिटेबल ट्रस्ट आणि डी. डि. विसपुते अध्यापक विद्यालय, पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात प्रदान करण्यात आला.
पुरस्कार सोहळा म्हसळा टाइम्सच्या १४व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आला होता. या वेळी दिलीप कांबळे यांच्यासोबत त्यांच्या पत्नी आणि मित्र परिवार देखील उपस्थित होता.
म्हसळा नगरपालिकेचे पहिले नगराध्यक्ष म्हणून त्यांनी प्रभावी कार्य केले असून, सध्या शिवकृपा पतसंस्थेचे चेअरमन म्हणून ते कार्यरत आहेत. अल्पावधीतच त्यांनी सामाजिक, शैक्षणिक, औद्योगिक आणि सहकार क्षेत्रात आपली छाप पाडली आहे. गवळी समाजासह इतर सामाजिक संस्थांमध्ये विविध पदांवर त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे.
पुरस्कार स्वीकारताना कांबळे म्हणाले, “आजचा सन्मान मला नवीन जबाबदारीची जाणीव करून देतो आहे. समाजातील तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हे माझे प्रमुख उद्दिष्ट आहे. हा पुरस्कार हा केवळ सन्मान नसून पुढील कार्यासाठी प्रेरणा आहे.”
दिलीप कांबळे यांना पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल मित्र परिवार, नातेवाईक व म्हसळा तालुक्यातील नागरिकांनी त्यांचे अभिनंदन केले असून संपूर्ण तालुक्यात आनंदाचे वातावरण आहे.
–------–
You sa
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके