पालघर, 12 ऑक्टोबर (हिं.स.) | पश्चिम रेल्वेच्या विरार–डहाणू रेल्वे मार्गावर विद्युत पुरवठा अचानक खंडित झाल्याने रेल्वेसेवा विस्कळीत झाली असून, प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विरार स्थानकावरून दुपारी ३:४५ वाजता डहाणूच्या दिशेने सुटलेली लोकल ट्रेन काही अंतरावर गेल्यानंतर विरार–वैतरणा दरम्यान विद्युत पुरवठा खंडित झाल्याने थांबली.
घटनेनंतर जवळपास अर्धा तास उलटूनही लोकल सुरू झाली नव्हती, त्यामुळे प्रवाशांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले. उष्णतेमुळे आणि गर्दीमुळे अनेक प्रवासी अस्वस्थ झाले होते.
विद्युत पुरवठा खंडित होण्याचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही, मात्र या बिघाडाचा परिणाम विरार–डहाणू मार्गावरील लोकल आणि काही एक्सप्रेस गाड्यांच्या वेळापत्रकावर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / NAVIN NARESH PATIL