बीजिंग , 14 ऑक्टोबर (हिं.स.)।चीनमध्ये एका भयानक कार अपघात घडला आहे. रस्त्याच्या मध्यभागी धावत असलेल्या एका इलेक्ट्रिक कारला अचानक आग लागली. यावेळी कारचे दरवाजे अचानक लॉक झाल्याने चालकाचा गाडीत अडकून मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, हा भीषण अपघात सोमवारी (दि.१३) चीनच्या चेंगदू शहरात शाओमीच्या एसयू ७ इलेक्ट्रिक सेडान कारसोबत घडला. या कारने आधी समोरून येणाऱ्या दुसऱ्या गाडीला जोरदार धडक दिली. धडक इतकी जबरदस्त होती की गाडीला आग लागली. आग लागल्यानंतर कारचे दरवाजे आपोआप लॉक झाले आणि चालकाचा गाडीत अडकून मृत्यू झाला. आगीच्या लाटांमुळे आणि धुरामुळे आजूबाजूचे लोक मदत करू शकले नाहीत.
पोलिसांच्या प्राथमिक तपासात मृत चालकाची ओळख 31 वर्षीय ‘देंग’ म्हणून झाली आहे. पोलिसांना शंका आहे की चालक नशेच्या अवस्थेत होता. यासोबतच, आग लागल्यानंतर दरवाजे का उघडले नाहीत?, याचीही चौकशी सुरू आहे.या घटनेचा विडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. विडिओ समोर आल्यानंतर सोमवारी शाओमी कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली. शाओमीचे शेअर्स तब्बल 8.7 टक्क्यांनी घसरले, जी एप्रिलनंतरची सर्वात मोठी घसरण आहे. आतापर्यंत शाओमी कंपनीने या प्रकरणावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे लोकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. ही घटना इलेक्ट्रिक वाहनांच्या सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode