जेरुसलेम, 14 ऑक्टोबर (हिं.स.)।“भारत हा एक महान देश आहे आणि त्याचं नेतृत्व माझे खूप चांगले मित्र करत आहेत,” असे विधान करत अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी भारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव न घेता त्यांची प्रशंसा केली. ते सोमवारी (दि.१३) गाझामधील इस्रायल-हामास युध्द थांबवण्यासाठी युद्धविरामावर सहमती झाल्यानंतर मिसरच्या शर्म अल शेख शहरात झालेल्या जागतिक नेत्यांच्या परिषदेत बोलत होते.
या परिषदेत ट्रम्प म्हणाले की, “माझ्या मते भारत आणि पाकिस्तान एकत्र खूप चांगले राहू शकतात.” ट्रम्प यांनी आपल्यामागे उभ्या असलेल्या पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्याकडे पाहत म्हणाले, “भारत एक महान देश आहे, आणि माझे खूप चांगले मित्र त्याचं नेतृत्व करत आहेत. त्यांनी अफलातून काम केलं आहे. मला वाटतं की पाकिस्तान आणि भारत एकत्र चांगले संबंध ठेवू शकतील.”या कार्यक्रमात ट्रम्प यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ आणि सेनाप्रमुख जनरल असीम मुनीर यांचंही कौतुक केलं. शहबाज शरीफ यांना भाषणासाठी आमंत्रित केल्यानंतर, त्यांच्या भाषणानंतर ट्रम्प पुन्हा व्यासपीठावर आले आणि म्हणाले: “शरीफ यांचं भाषण अप्रतिम होतं. आता सांगण्यासारखं काही उरलं नाही, चला घरी जाऊया!” (हसून)
ट्रम्प यांनी याआधी भारत-पाकिस्तान वादासह ७ आंतरराष्ट्रीय संघर्ष सोडवले असल्याचा दावा केला होता.पण आता त्यांनी इस्रायल-गाझा युद्ध थांबवल्याचाही दावा करत ही संख्या ८ केली आहे. “माझ्या हस्तक्षेपामुळे ८ युद्ध थांबवण्यात आली आहेत. हा माझ्यासाठी सन्मान आहे. मी लाखो लोकांचे प्राण वाचवले.” “जरी मला नोबेल शांतता पुरस्कार मिळाला नाही, तरीही मी हे जीवन वाचवण्यासाठी केलं, पुरस्कारासाठी नाही.”
ट्रम्प यांनी १० मे रोजी सोशल मीडियावर दावा केला होता की,“अमेरिकेच्या मध्यस्थीमुळे भारत आणि पाकिस्तान “पूर्ण व तात्काळ” संघर्षविरामावर सहमत झाले आहेत.” ट्रम्प अनेक वेळा म्हणाले की त्यांनी भारत-पाकिस्तान संघर्षाचा ‘उपाय’ काढला आहे. मात्र, भारत सरकारने हे स्पष्ट केलं आहे की संघर्षविरामाची सहमती भारत आणि पाकिस्तानच्या लष्करी डीजीएमओ यांच्यातील थेट संवादातून झाली होती, अमेरिकेच्या मध्यस्थीमुळे नव्हे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode