रायगड, 16 ऑक्टोबर (हिं.स.)।
बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन आता “अलिबागकर” झाले आहेत. शाहरुख खान, रणवीर सिंग, दीपिका पदुकोण, अनुष्का शर्मा यांच्यानंतर आता बिग बींनीही अलिबागच्या शांत, निसर्गरम्य परिसरात आपला ठाव घेतला आहे. त्यांनी मुनवली येथे साडे सहा कोटी रुपयांना तीन विकसित भूखंड खरेदी केले असून या व्यवहाराची नोंदणी नुकतीच अलिबागच्या दुय्यम निबंधक कार्यालयात करण्यात आली आहे.
सागरी व पर्यावरणीय सौंदर्यामुळे प्रसिद्ध असलेला अलिबाग परिसर गेल्या काही वर्षांत मुंबईकरांसह नामांकित व्यक्तींसाठी गुंतवणुकीचे प्रमुख ठिकाण ठरला आहे. देशातील अनेक उद्योगपती, कलाकार आणि क्रिकेटपटू येथे आपली मालमत्ता उभारत आहेत. त्याच मालिकेत आता अमिताभ बच्चन यांचाही समावेश झाला आहे.
बच्चन यांनी खरेदी केलेल्या तीन भूखंडांचे क्षेत्रफळ अनुक्रमे ३,७६०, २,५८०, आणि २,५४० चौरस फूट इतके आहे. या भूखंडांचे बाजारमूल्य अनुक्रमे ₹२.७९ कोटी, ₹१.९२ कोटी आणि ₹१.८८ कोटी असून एकूण मूल्य ₹६.५९ कोटी आहे. त्यांनी या व्यवहारासाठी ₹३९.५८ लाखांचे मुद्रांक शुल्क आणि ₹९० हजारांचे नोंदणी शुल्क भरले आहे.
मुंबई–अलिबाग अंतर कमी करणाऱ्या अटल सेतू, रेवस–करंजा पूल, आणि नवी मुंबई विमानतळाच्या जवळिकीमुळे या भागातील जमीनमूल्य झपाट्याने वाढले आहे. त्यामुळे अनेक रिअल इस्टेट कंपन्यांनी येथे आलिशान प्रकल्प उभारणीस सुरुवात केली आहे.
दुबईतील बुर्ज खलिफा उभारणाऱ्या एम्मार कंपनीचा “कासा वेनेरो”, लोढा समूहाचा “हाऊस ऑफ अभिनंदन लोढा”, हिरानंदानींचा नागाव टाउनशिप प्रकल्प, आणि महिंद्रा मेरिडियन–ओबेरॉय रियल्टीचा टेकाळी प्रकल्प हे त्याचे उदाहरण आहे. अलिबागचा हा वेगाने विकसित होत असलेला लक्झरी झोन आता बॉलीवूड ते उद्योगजगत अशा सर्वांसाठी आकर्षणाचे केंद्र बनला आहे
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके