काबूल, १८ ऑक्टोबर (हिं.स.)अफगाणिस्तानच्या सीमावर्ती प्रांत पक्तिका येथे पाकिस्तानने केलेल्या हवाई हल्ल्यात तीन अफगाण क्रिकेटपटूंसह आठ जणांचा मृत्यू झाला. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने सांगितले की, हे क्रिकेटपटू उर्गुनहून पक्तिका प्रांतातील शरण येथे मैत्रीपूर्ण सामन्यात सहभागी होण्यासाठी जात होते. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने कबीर, सिबगतुल्ला आणि हारून अशी तीन क्रिकेटपटूंची ओळख पटवली आहे आणि या हल्ल्यात इतर पाच जणांचाही मृत्यू झाल्याचे म्हटले आहे. एसीबीने हा पाकिस्तानी राजवटीचा भ्याड हल्ला असल्याचे वर्णन केले आहे. हल्ल्यानंतर अफगाणिस्तानने त्रिकोणी मालिकेतून माघार घेतली. एसीबीने हल्ल्याबद्दल अधिक माहिती दिली नाही.
एसीबीने सांगितले की, सामना संपल्यानंतर उर्गुनला परतत असताना त्यांना लक्ष्य करण्यात आले. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने याला अफगाणिस्तानच्या खेळांसाठी मोठे नुकसान म्हटले आहे. बोर्डाने हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या क्रिकेटपटूंच्या कुटुंबीयांबद्दल शोक व्यक्त केला. अफगाणिस्तान संघाचा कर्णधार राशिद खाननेही या घटनेवर दुःख व्यक्त केले आणि सोशल मीडियावरील पोस्टमध्ये लिहिले की, अफगाणिस्तानवर अलिकडेच झालेल्या पाकिस्तानी हवाई हल्ल्यात नागरिकांच्या मृत्युमुळे मला खूप दुःख झाले आहे. राशिद खान म्हणाला, नागरिक लक्ष्यांवर हल्ला करणे पूर्णपणे अनैतिक आणि क्रूर आहे. हे मानवी हक्कांचे गंभीर उल्लंघन आहे आणि त्याविरुद्ध कारवाई केली पाहिजे.
राशि खानने पाकिस्तानसोबत तिरंगी मालिका न खेळण्याच्या एसीबीच्या निर्णयाचे कौतुक केले. राशिद खान म्हणाला की, अशा कठीण काळात राष्ट्रीय अभिमान सर्वात आधी येतो. आणखी एक अव्वल अफगाणिस्तानचा क्रिकेटपटू मोहम्मद नबी यानेही पाकिस्तानी हवाई हल्ल्यावर तीव्र टीका केली आणि क्रिकेटपटूंच्या मृत्यूला संपूर्ण अफगाण क्रिकेट कुटुंबावर हल्ला म्हटले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे