नागपूर,02 ऑक्टोबर (हिं.स.) : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षात साजऱ्या झालेल्या विजयादशमी उत्सवाने यंदा इतिहास रचला. पारंपरिक शस्त्रपूजनात प्रथमच अत्याधुनिक संरक्षण उपकरणे ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये वापरले गेलेले ड्रोन आणि संपूर्ण स्वदेशी बनावटीचे पिनाका बहुवेधी अग्निबाण (मल्टी बॅरल रॉकेट लाँचर सिस्टीम) पूजेत ठेवण्यात आले होते. नागपूरच्या रेशीमबाग मैदानावर पार पडलेल्या या सोहळ्याने परंपरा आणि आधुनिकतेचे विलक्षण संमेलन साकारले.
परंपरेनुसार विजयादशमीच्या दिवशी संघाच्या मुख्य कार्यक्रमात तलवार, भाला, धनुष्यबाण यांसारख्या पारंपरिक शस्त्रांचे पूजन केले जाते. मात्र शताब्दी वर्षाच्या निमित्ताने संघाने एक ऐतिहासिक पाऊल उचलत, राष्ट्रीय सुरक्षेच्या नव्या आव्हानांना अनुसरून या पूजनात आधुनिक शस्त्रांचा समावेश केला. कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरले ऑपरेशन सिंदूर मध्ये वापरले गेलेले उन्नत ड्रोन. त्याचबरोबर चंद्रपूर आणि अंबाझरी ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये बनवलेले पिनाका अग्निबाण प्रथमच सार्वजनिकरित्या पूजेसाठी ठेवण्यात आले. या ऐतिहासिक सोहळ्याला माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. विशेष म्हणजे, सरसंघचालक मोहन भागवत यांनी परंपरेला छेद देत प्रारंभीच कोविंद यांना भाषणासाठी आमंत्रित केले. कोविंद यांनी आपल्या भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संघ यांच्यातील ऐतिहासिक संबंध अधोरेखित केले. त्यांनी 1940 मध्ये डॉ. आंबेडकरांनी कराडमधील संघ शाखेला दिलेली भेट आणि त्यावरील अनुकूल प्रतिक्रिया याची आठवण सांगितली.
यानंतर सरसंघचालक भागवत यांनी ध्वजारोहण, शस्त्रपूजन, आणि आपल्या भाषणाद्वारे देशाच्या सुरक्षेच्या बदलत्या गरजा, सामाजिक समरसता आणि आत्मनिर्भरतेचे महत्त्व अधोरेखित केले.
कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विविध क्षेत्रातील मान्यवर, तसेच देश-विदेशातील निमंत्रित मोठ्या संख्येने उपस्थित होते. शताब्दी वर्षाच्या औचित्याने पाहुण्यांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती.
--------------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी