* उपमुख्यमंत्री शिंदेंनी साधला धाराशिवमधील पूरग्रस्त कुटुंबांशी संवाद
धाराशिव, २ ऑक्टोबर (हिं.स.) : पुराच्या पाण्याने उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबाला शिवसैनिकांनी मदतीचा हात देत त्यांचा मोडून पडलेला संसार पुन्हा उभा करण्यासाठी मदतीचा हात दिला आहे. संकटकाळी येऊन मदत केल्याबद्दल या शेतकऱ्यांनी शिंदे यांच्याशी फोनवरून संवाद साधत त्यांचे आभार मानले आहेत.
सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीचा मोठा फटका मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना बसला. त्या पार्श्वभूमीवर यंदाचा दसरा मेळावा अत्यंत साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी घेतला होता. उर्वरित राज्यातील शिवसैनिकांना त्यांनी दसरा मेळाव्यासाठी मुंबईत न येता थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांना मदत करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार धाराशिव जिल्ह्यातील शिवसैनिकांनी कळंब तालुक्यातील आथर्डी गावातील ग्रामस्थांना आधार देण्याचा निर्णय घेतला. युवासेनेचे मराठवाडा निरीक्षक बाजीराव चव्हाण, माजी आमदार ज्ञानराज
चौगुले, भगवान देवकाते, अजित पिंगळे, नितीन लांडगे यांनी काल त्यांच्या घरी जाऊन त्यांचे घर स्वच्छ केले. घरातील अस्ताव्यस्त पडलेल्या वस्तू जागेवर ठेवल्या, घराचा परिसर स्वच्छ आणि निर्जंतुक केला, गावातील अंगणवाडी पुराच्या पाण्याने खराब झाली होती तीदेखील शिवसैनिकांच्या साथीने पाण्याने धुवून, झाडून स्वच्छ केली. तसेच पुरात पूर्णपणे उध्वस्त झालेल्या कुटुंबांना २६ जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करून त्यांना आधार दिला.
शिवसेनेच्या मदतीमुळे कालपर्यंत चिंताग्रस्त असलेल्या या कुटुंबांना आशेचा नवा किरण दिसू लागला. मिळालेल्या मदतीमुळे आज दसऱ्याच्या सणाला त्यांनी मोठ्या घराबाहेर छान रांगोळी काढली, घराला तोरण बांधून दसऱ्याचा सण साजरा केला. यावेळी शिंदे यांनी स्वतः व्हिडीओ कॉल करून या कुटुंबाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शिवसेनेच्या मदतीमुळे या संकटकाळात मोठा आधार मिळाल्याचे त्यांना सांगितले. तसेच तुम्ही केलेली मदत ही अत्यंत योग्यवेळी मिळाल्याने आमचा दसरा गोड होऊ शकला असल्याचे त्यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांना सांगितले. तसेच या घरातील महिला भगिनींनी शिंदे यांना आपटयाचे पान देत आपल्या लाडक्या भावाला बहिणीकडून दसऱ्याच्या शुभेच्छा देत असल्याचे सांगितले.
स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आणि गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे यांची ८० टक्के समाजकारण २० टक्के राजकारणाची शिकवण पुढे नेत यंदाचा दसरा मेळावा साजरा करण्यात येत असून धाराशिव प्रमाणेच इतर जिल्ह्यातही शिवसेनेचे पदाधिकारी शेतकऱ्यांच्या बांधावर जात त्याला मदत करून दसरा साजरा करत आहेत. ' शिवसेनेचे धोरण बांधू पूरग्रस्तांच्या मदतीचे तोरण' हेच यंदाच्या दसऱ्याला शिवसैनिकांनी सिद्ध करून दाखवले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी