मुंबई, 20 ऑक्टोबर (हिं.स.)। दिवाळी ही प्रत्येकासाठी खास असते, पण एका नवविवाहित स्त्रीसाठी ती आणखीनच खास भावना घेऊन येते. पहिली दिवाळी सासरी साजरी करणं आणि ते ही नव्या घरात, नव्या माणसांत आपली ओळख निर्माण करणं, आणि जुन्या आठवणींना नव्या आनंदाने सजवणं. अभिनेत्री शिवानी सोनार म्हणजेच तारिणी, तिची पहिली दिवाळी सासरी साजरी करणार आहे आणि तिच्या आनंदाला पारावर उरलेला नाही .
दिवाळी मधल्या फराळ बद्दल जेव्हा शिवानीला विचारले गेले कि ती कोणत्या पदार्थ सारखी आहे ती म्हणाली मला असं वाटतं की मी करंजीसारखी आहे, बाहेरून कडक पण आतून गोड. कारण कधी कधी लोकांना वाटतं मी अॅटीट्यूडवाली, रागीट, आहे, पण तसं काही नाही. जेव्हा मी कुणावर जीव लावते, तेव्हा मी त्यांच्याशी भावनिकदृष्ट्या खूप जोडली जाते. यंदाची भाऊबीज खास आहे कारण माझ्या भावाला पहिली नोकरी लागली आहे आणि तो मला यंदा स्वतःच्या मेहनतीच्या पैशातून गिफ्ट घेणार आहे. याआधी आईवडिल त्याला गिफ्ट घेऊन द्यायचे आणि तो मला द्यायचा. पण यंदा तो स्वतः कमावून देणार आहे. माझ्यासाठी ही एक अभिमानाची गोष्ट आहे. यंदाची दिवाळी खरंच सगळ्या अर्थाने माझ्यासाठी स्पेशल आहे.
शिवानी म्हणाली, आजपर्यंत मी प्रत्येक वर्षी आई-वडिल आणि भावासोबत घरी दिवाळी साजरी केली आहे, पण यंदा माझं लग्नानंतरचं पहिलं वर्ष आहे आणि पहिली दिवाळी सासरी असल्यामुळे एक वेगळीच उत्सुकता आहे. मी कायम सगळे दिवाळीचे रितीरिवाज पाळले आहेत, मग तो फराळ करणं असो, रांगोळी काढणं, अभ्यंगस्नान, किल्ला बनवणं आणि यंदाही शुटिंग सुरू असतानाही शक्य असेल तेवढं सगळं करणार आहे. यंदाचा दिवाळी पाडवा माझ्यासाठी खास आहे, कारण हा माझा पहिला पाडवा आहे आणि अंबरने माझ्यासाठी काहीतरी सरप्राइझ प्लॅन केलं आहे, त्यामुळे मी खूपच एक्सायटेड आहे.
शिवानी सोनार दिवाळी कशी साजरी करणार आहे हे तर तुम्ही जाणून घेतले पण तारिणी आपली दिवाळी कशी साजरी करणार ते बघायला विसरू नका दररोज रात्री ९:३० वा. सदैव तुमच्या झी मराठीवर.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule