मनिला , 20 ऑक्टोबर (हिं.स.)।उत्तर आणि मध्य फिलिपिन्समध्ये आलेल्या उष्णकटिबंधीय वादळ ‘फेंगशेन’मुळे किमान ७ लोकांचा मृत्यू झाला आहे. या वादळामुळे २२,००० हून अधिक लोकांना पूर व भूस्खलनाचा धोका असलेल्या भागांमधून सुरक्षित ठिकाणी हलवावे लागले आहे.
हवामान अंदाज संस्थेने सांगितले की, ‘फेंगशेन’ रविवारच्या मध्यरात्री उत्तर फिलिपिन्सच्या लुझोन बेटावरून दक्षिण चीन समुद्राच्या दिशेने सरकले आणि या दरम्यान ६५ ते ८० किमी प्रति तास वेगाने वारे वाहत होते.सरकारी आपत्ती व्यवस्थापन संस्थेने या वादळामुळे ७ जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी केली आहे. संस्थेने सांगितले की मध्य कॅपिज प्रांतातील रोक्सास शहरात भरतीच्या पाण्यामुळे अनेक गावांमध्ये पूरपरिस्थिती गंभीर झाली आणि त्यामुळे परिस्थिती अधिक बिकट झाली. आपत्ती निवारण आणि बचाव पथकांनी नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवले आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सरकारी आपत्ती व्यवस्थापन संस्थेच्या माहितीनुसार, रोक्सासमध्ये पूराच्या पाण्यात बुडून एका व्यक्तीचा मृत्यू झाला, तर पूर्व क्यूझोन प्रांतातील पिटोगो गावात एका झोपडीवर झाड कोसळल्यामुळे तिथे झोपलेले दोन लहान मुलांसह पाच जणांचा मृत्यू झाला. संस्थेच्या माहितीनुसार, वादळामुळे सुमारे १४,००० लोक बेघर झाले आहेत. त्यांनी हेही सांगितले की ‘फेंगशेन’ आता दक्षिण चीन समुद्रातून पुढे वियतनामच्या दिशेने सरकण्याचा अंदाज आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode