भाजपाचे नूतन कार्यालय अनेक पिढ्या सच्चे कार्यकर्ते घडवेल - अमित शाह
* महाराष्ट्र भाजपाच्या नव्या प्रदेश कार्यालयाचे भूमिपूजन संपन्न मुंबई, 27 ऑक्टोबर (हिं.स.) - भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्यासाठी कार्यालय हे मंदिरासमान असते. जनसंघाच्या स्थापनेपासूनच कार्यालयातून संघटना उभारणीचे काम, पक्षाच्या सिद्धांतांचे संवर्धन
अमित शाह महाराष्ट्र भाजप नूतन प्रदेश कार्यालय भूमिपूजन


अमित शाह महाराष्ट्र भाजप नूतन प्रदेश कार्यालय भूमिपूजन


महाराष्ट्र भाजप नूतन प्रदेश कार्यालय फोटो


* महाराष्ट्र भाजपाच्या नव्या प्रदेश कार्यालयाचे भूमिपूजन संपन्न

मुंबई, 27 ऑक्टोबर (हिं.स.) - भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्यासाठी कार्यालय हे मंदिरासमान असते. जनसंघाच्या स्थापनेपासूनच कार्यालयातून संघटना उभारणीचे काम, पक्षाच्या सिद्धांतांचे संवर्धन, कार्यकर्ता प्रशिक्षण, जनहितासाठी संघर्ष केला जातो. नवीन प्रदेश कार्यालय पुढच्या अनेक पिढ्या सच्चे कार्यकर्ते घडवेल, असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सोमवारी व्यक्त केला. श्री. शाह यांच्या हस्ते भारतीय जनता पार्टीच्या नवीन प्रदेश कार्यालयाचे भूमिपूजन सोमवारी संपन्न झाले. त्यावेळी ते बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला.

विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, पणन मंत्री जयकुमार रावल, कौशल्य विकासमंत्री मंगल प्रभात लोढा, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, खा. नारायण राणे, ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे, सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार, पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे, इतर मागास बहुजन कल्याण अतुल सावे, वनमंत्री गणेश नाईक, कामगार मंत्री आकाश फुंडकर, आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, भाजपा मुंबई अध्यक्ष आ. अमित साटम, प्रदेश सरचिटणीस आ. विक्रांत पाटील, सरचिटणीस माधवी नाईक, राजेश पांडे, खा. उज्ज्वल निकम, मनोज कोटक आदी उपस्थित होते.

श्री. शाह म्हणाले की, अन्य सर्व पक्षांसाठी पक्षकार्यालय ही केवळ वास्तू असते. मात्र भाजपा कार्यकर्त्यांसाठी कार्यालय हे मंदिराप्रमाणे असते. भाजपा हा एकमेव पक्ष आहे जिथे बूथ अध्यक्ष पार्टीचा अध्यक्ष बनतो. पंतप्रधान, मुख्यमंत्री हे देखील कार्यकर्त्यांमधूनच बनतात. भाजपामध्ये घराणेशाहीला थारा नाही असे म्हणत श्री. शाह यांनी काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांवर टीका केली. लोकशाही मूल्यांवर आधारित भाजपाचा कारभार आहे. सेवा,त्याग, समर्पण आणि देशभक्तीच्या बळावर जो कार्य करतो तो सामान्य कार्यकर्ताही उंचीवर जाऊ शकतो. नरेंद्र मोदी हे त्याचे उत्कृष्ट उहादरण आहे असेही त्यांनी नमूद केले. जो पक्ष लोकशाही मूल्यांवर चालतो तोच पक्ष लोकशाहीचे खऱ्या अर्थाने रक्षण करू शकतो असा टोला घराणेशाहीवर चालणा-या पक्षांना लगावला. सर्व शासकीय जिल्ह्यांतील भाजपा मुख्यालयांची कामे ही डिसेंबर 2026 पर्यंत पूर्ण होतील. जवळपास 660 संघटनात्मक जिल्ह्यांपैकी 375 जिल्ह्यांत कार्यालये आहेत आणि 90 ठिकाणी काम सुरू आहे असेही त्यांनी नमूद केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश आज सर्वच आघाड्यांवर अव्वल बनत आहे. गरीब कल्याण, मोफत धान्यवाटप, मोफत वैद्यकीय सुविधांमुळे गरीबांचे जीवन सुकर केले आहे. अर्थव्यवस्था 11व्या स्थानावरून 4थ्या क्रमांकाची बनली आहे. देश बलशाली, आत्मनिर्भर आणि सुरक्षीत बनला आहे. दहशतवादी हल्ले करणा-यांना जबर धडा शिकवला जात असल्याचेही श्री. शाह यांनी सांगितले.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ज्यांनी प्रत्येक शासकीय जिल्ह्यांत भाजपाचे कार्यालय असावे हा निर्धार केला होता त्या केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते प्रदेश कार्यालयाचे भूमिपूजन होणे हा सर्वांसाठी आनंदाचा क्षण आहे. दोन ते अडीच वर्षांत हे कार्यालय बांधून पूर्ण होईल. जनसामान्यांना न्याय तसेच कार्यालयात कार्यकर्त्यांना प्रशीक्षण मिळायला हवे या हेतूने देशभरात भाजपाच्या कार्यालय निर्माणाचे काम वेगाने सुरू आहे. यावेळी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण म्हणाले की, पक्ष उभारणी, जनसामान्यांची कामे आणि कार्यकर्ते घडवण्यासाठी प्रत्येक शासकीय जिल्ह्यात पक्ष कार्यालय असावे याबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आग्रही होते. त्यांनी सातत्याने याबाबत मार्गदर्शन केले होते. पहिल्यांदा मुख्यमंत्री झाल्यापासून देवेंद्र फडणवीस यांनीही प्रदेश भाजपाच्या नवीन कार्यालय उभारणीसाठी अनेक प्रयत्न करून पाठपुरावा केला. या दोघांच्या प्रयत्नांमुळे ही नवीन वास्तू लवकरच तयार होणार आहे.

तत्पूर्वी सोमवारी सकाळी भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सपत्नीक पूजा केली.

जागा बळकावण्याची सवय जडलेल्यांनी आम्हाला प्रश्न विचारू नयेत - मुख्यमंत्री फडणवीस

भाजपाचे कार्यालय हे पक्षाचे आणि कार्यकर्त्यांचे घर असते. प्रदेश भाजपाच्या या नवीन कार्यालयाची जागा स्वखर्चाने विकत घेऊन, महापालिकेचे सर्व नियम पाळून, नियमात कुठलीही सूट न घेता खरेदी करण्यात आली आहे. सर्व परवानग्या, सर्व प्रक्रिया पूर्ण करूनच हे कार्यालय बांधण्यात येत आहे. भाजपा काचेच्या घरात रहात नाही. तेव्हा दगड फेकू नका. जागा बळकावण्याची सवय जडलेल्यांनी आम्हाला प्रश्न विचारू नयेत, असे म्हणत श्री. फडणवीस यांनी विरोधकांना लक्ष्य केले. भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या स्वप्नातील कार्यालय सामुहिक प्रयत्नांतून साकारेल त्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने समर्पण निधी द्यावा असे आवाहनही त्यांनी केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande