'रील स्टार' चित्रपट १४ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
कोल्हापूर, 28 ऑक्टोबर, (हिं.स.)। मराठी चित्रपटाच्या कक्षा रुंदावणारा चित्रपट ''रील स्टार'' १४ नोव्हेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. रायमा सेन, अवधूत गुप्ते, आकाश ठोसर, सायली पाटील, सोमनाथ अवघडे, गौरव मोरे, अनंत महादेवन, गुरू ठाक
'रील स्टार' चित्रपट


कोल्हापूर, 28 ऑक्टोबर, (हिं.स.)। मराठी चित्रपटाच्या कक्षा रुंदावणारा चित्रपट 'रील स्टार' १४ नोव्हेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. रायमा सेन, अवधूत गुप्ते, आकाश ठोसर, सायली पाटील, सोमनाथ अवघडे, गौरव मोरे, अनंत महादेवन, गुरू ठाकूर, आदर्श शिंदे इत्यादी हिंदी आणि मराठी सिनेविश्वातील दिग्गज कलाकारांनी 'रीलस्टार'चा ट्रेलर शेअर केला आहे.

जर एक सामान्य माणूस मनापासून सत्तेच्या बाजूने उभा राहिला ना, तर संपूर्ण सिस्टीम वठणीवर आणू शकतो', सायकलवरून फिरून सामान विकणाऱ्या भानुदास नावाच्या रस्त्यावरील एका विक्रेत्याची आणि त्याच्या कुटुंबाची कथा या चित्रपटात आहे. भानुदास जरी सायकलवरून सामान विकत असला तरी कमालीची रील बनवण्याची कला त्याच्या अंगी आहे. भानुदास आणि याच्या पत्नीची काही स्वप्ने आहेत. त्या स्वप्नांची गोष्ट 'रील स्टार'मध्ये पाहायला मिळणार आहे.

सत्ता, संघर्ष, जाती-पातीचे राजकारण आणि पैशांचा पॉवरगेमही या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. 'पोलीसांच्या कर्तव्यनिष्ठेची जागा मनी आणि मसल पॉवर असलेले गब्बर घेतात, तेव्हा सामान्य माणसाला न्याय मिळत नाही' हा संवाद खूप काही सांगणारा आहे. 'तुम्ही आम्हाला मारून टाकू शकता, हरवू शकत नाही', यांसारखे ट्रेलरमधील संवाद उत्सुकता वाढविणारे आहेत. 'गर गर गरा, जिंदगी घुमे चाकावरती...' हे गाणे कथानकाचा गाभा सांगणारे आहे.

दिग्दर्शक सिम्मी आणि रॉबिन यांनी 'रील स्टार'द्वारे वास्तवदर्शी कथानक प्रेक्षकांच्या भेटीला आणले आहे. याबाबत ते म्हणाले की, या चित्रपटाची कथा आपल्या सर्वांच्या आजूबाजूलाच घडणारी आहे असे प्रेक्षकांना वाटेल. सर्वसामान्य माणसाच्या स्वप्नांची सांगड, संघर्ष आणि समाजव्यवस्थेतील राजकारणाशी घालून आम्ही एक मनोरंजक चित्रपट बनवला आहे.

जोस अब्राहम, मोनिका आणि निशील कंबाती यांनी जे-फाइव्हज एंटरटेनमेंट्स, फिनिक्स ग्रुप आणि इनिशिएटिव्ह फिल्म्सच्या बॅनरखाली 'रीलस्टार' चित्रपटाची निर्मिती केली आहे. दिग्दर्शक सिम्मी आणि रॉबिन यांनी 'रील स्टार'चे दिग्दर्शन केले आहे. नागराज मंजुळे यांचे सहायक दिग्दर्शक सुधीर कुलकुर्णी यांनी 'रीलस्टार'चे लेखन केले आहे. या चित्रपटात एकूण पाच गाणी आहेत. 'दृश्यम' फेम संगीतकार विनू थॉमस यांनी या चित्रपटातील चार गीतांना संगीतसाज चढवला असून, एक गाणे संगीतकार शुभम भट यांनी संगीतबद्ध केले असून शुभम भट यांनी सुप्रसिद्ध संगीतकार ए. आर. रेहमान यांचे सहायक म्हणून काम केले आहे.

नागराज मंजुळे यांचे बंधू भूषण मंजुळे या चित्रपटात शीर्षक भूमिकेत असून, हाडाच्या पत्रकाराच्या दमदार व्यक्तिरेखेत प्रसाद ओक आहे. या दोघांच्या जोडीला मिलिंद शिंदे, कैलास वाघमारे, उर्मिला जे जगताप, रुचिरा जाधव, स्वप्नील राजशेखर, शुभांगी लाटकर, विजय पाटकर, अनंत महादेवन, ज्ञानेश वाडेकर, महेश सुभेदार, शिवाजी पाटणे, गणेश रेवडेकर, अभिनय पाटेकर, विशाल अर्जुन, राजेश मालवणकर, जगदीश हाडप, पुनम राणे, अभय शिंदे, अनिल कवठेकर, विनिता शिंदे, प्रशांत शिंदे, करीश्मा देसले आदी कलाकार आहेत. बालकलाकार अर्जुन गायकर आणि तनिष्का म्हाडसे यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. निलेश रसाळ यांनी कला दिग्दर्शन केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar


 rajesh pande