
लातूर, 29 ऑक्टोबर (हिं.स.)।अहमदपूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या उर्वरित अनुदानाचे वाटप तातडीने पूर्ण करण्याच्या उद्देशाने अहमदपूर तहसील कार्यालय सध्या रात्री उशिरापर्यंत सुरू आहे. प्रशासकीय स्तरावर निधी वितरणाची प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असून, हे अनुदान लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार असल्याची माहिती आहे आहे.
गेल्या काही दिवसांपासून शेतकरी विविध नैसर्गिक संकटांमुळे अतिवृष्टी नुकसान भरपाईच्या अनुदानाची प्रतीक्षा करत आहेत. या अनुदानाचे काही टप्पे वितरित झाले असले तरी, उर्वरित निधी जमा होण्यास विलंब होत होता. शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेऊन, तहसील कार्यालयाने या समस्येची गंभीर दखल घेतली आहे.
अनुदानाचे निकष पूर्ण केलेल्या लाभार्थी शेतकऱ्यांची यादी अंतिम करणे, निधीच्या मागणीचा प्रस्ताव तयार करणे आणि ई-पेमेंटच्या माध्यमातून थेट बँक खात्यात पैसे जमा करण्याची तांत्रिक प्रक्रिया सध्या वेगाने सुरू आहे. तहसील कार्यालयातील कर्मचारी केवळ दिवसाच नव्हे, तर रात्री उशिरापर्यंत थांबून कागदपत्रांची छाननी आणि ऑनलाइन प्रक्रिया पूर्ण करत आहेत. यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यावर निधी जमा होण्याची प्रक्रिया अत्यंत कमी वेळेत पूर्ण होईल.
तालुक्यातील अनेक शेतकरी पेरणी, नांगरणी आणि इतर शेतीकामांसाठी या अनुदानावर अवलंबून आहेत. वेळेवर मदत मिळाल्यास, त्यांना पुढील शेती नियोजन करणे शक्य होणार आहे. प्रशासनाच्या या तत्परतेमुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
रात्री उशिरापर्यंत काम सुरू असल्याने अनुदानाचे वितरण लवकर होईल व अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना शेतीच्या कामांसाठी आर्थिक आधार मिळेल तसेच प्रशासनाने शेतकऱ्यांच्या मागणीची दखल घेऊन तत्काळ पाऊल उचलल्याचे यामुळे स्पष्ट होत आहे
सध्या अनुदान कधी जमा होणार याची नेमकी तारीख जाहीर झालेली नसली तरी, तहसील कार्यालयाच्या या वेगवान हालचाली पाहता, पुढील काही दिवसांतच शेतकऱ्यांच्या खात्यात उर्वरित अनुदान जमा होण्याची शक्यता आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis