
मुंबई, 30 ऑक्टोबर (हिं.स.) -
भारतीय लष्करातर्फे 31 ऑक्टोबर रोजी 'यंग लीडर्स फोरम'चे आयोजन करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम भारताचे पहिले उपपंतप्रधान आणि गृहमंत्री सरदार वल्लभाई पटेल यांच्या जयंतीदिनी, अर्थात राष्ट्रीय एकता दिनानिमित्त प्रतिकात्मक स्वरूपात आयोजित केला जात आहे. सरदार पटेल यांनी एकता आणि लवचिकतेच्या दूरदृष्टीनेच एका मजबूत आणि सुरक्षित राष्ट्राची पायाभरणी केली. हा कार्यक्रम लष्कराचा प्रमुख आंतरराष्ट्रीय धोरणात्मक मेळावा असलेल्या 'चाणक्य डिफेन्स डायलॉग 2025' ची पूर्वतयारी असेल.
“वीर युवा : भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी युवकांचे सक्षमीकरण” या संकल्पनेवर आधारित, ही परिषद 'विकसित भारत @ 2047' च्या राष्ट्रीय स्वप्नासाठी भारतातील तरुणांना एकत्र आणण्याच्या लष्कराच्या दृष्टिकोनाचे प्रतीक आहे. राष्ट्राची एकता, लवचिकता आणि सुरक्षा जागरूकता मजबूत करण्याच्या दिशेने भारतीय तरुणांची ऊर्जा, सर्जनशीलता आणि देशभक्ती वळवणं हा याचा उद्देश आहे.
या कार्यक्रमात संसदीय कार्य मंत्री आणि अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू; लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी आणि खासदार तेजस्वी सूर्या यांची भाषणे होतील. तसेच, प्रख्यात व्यक्ती, उद्योजक, विद्वान आणि युथ आयकॉन्स यांच्या नेतृत्वाखाली संवादात्मक सत्रे होतील. या चर्चांमध्ये भारतातील तरुण नवोन्मेष, तंत्रज्ञान, नागरी नेतृत्व आणि संरक्षण उद्योजकता यांच्या माध्यमातून राष्ट्रीय सुरक्षा आणि विकासात कसे योगदान देऊ शकतात, याचा शोध घेतला जाईल.
राष्ट्रीय एकता दिनी या परिषदेचे आयोजन करून, भारतीय लष्कर सरदार पटेल यांच्या मजबूत, एकसंध आणि सुरक्षित भारताच्या चिरस्थायी दूरदृष्टीला अभिवादन करत आहे, तसेच भविष्यातील राष्ट्राची ताकद तरुणांमध्येच आहे, याचा पुनरुच्चार करत आहे.
रिफॉर्म टू ट्रान्सफॉर्म: सशक्त, सुरक्षित और विकसित भारत या संकल्पनेवर आधारित 'चाणक्य डिफेन्स डायलॉग 2025' ची पूर्वतयारी म्हणून, हा 'यंग लीडर्स फोरम' तरुणांची ऊर्जा आणि धोरणात्मक अंतर्दृष्टी यांच्यातील दुवा ठरेल अशी अपेक्षा आहे. ही परिषद जागरूकतेला कृतीत आणि आकांक्षेला कर्तृत्वात रूपांतरित करेल.
थोडक्यात सांगायचे तर, 'यंग लीडर्स फोरम' हा केवळ एक कार्यक्रम नाही, तर 'विकसित भारत @ 2047' च्या मार्गावर - एकता, नवोन्मेष आणि राष्ट्रीय उद्देशाचे मशालवाहक असलेल्या - भारतातील तरुणांच्या सामूहिक शक्तीला जागृत करणारी एक चळवळ आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी