
मुंबई, 16 नोव्हेंबर (हिं.स.)। देशातील सरकारी दूरसंचार कंपनी बीएसएनएलने आपल्या प्रीपेड ग्राहकांसाठी एक नवी आणि किफायतशीर ऑफर जाहीर केली आहे. कंपनीने सिल्व्हर ज्युबिली प्रीपेड प्लॅन फक्त 225 रुपयांमध्ये सादर केला असून हा प्लॅन मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध करण्यात आला आहे. या प्लॅनमध्ये युजर्सना दररोज 2.5 GB हाय-स्पीड डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएसची सुविधा मिळणार आहे. प्लॅनची वैधता 30 दिवसांची असून सोशल मीडियावर कंपनीने याची अधिकृत घोषणा केली आहे.
या प्लॅनअंतर्गत दिला जाणारा 2.5 GB डेटा संपल्यानंतर Fair Usage Policy नुसार इंटरनेटचा वेग 40kbps इतका कमी होईल; मात्र पुढील दिवसाची मर्यादा रीसेट झाल्यानंतर पुन्हा हाय-स्पीड इंटरनेट सुरू होते. त्यामुळे सतत इंटरनेट वापरणाऱ्या ग्राहकांसाठी हा प्लॅन अतिशय परवडणारा ठरू शकतो.
बीएसएनएलचे विद्यमान ग्राहक My BSNL App, BSNL Self Care App किंवा कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरून सहज रिचार्ज करू शकतात. नवीन युजर्सना बीएसएनएल सिम आणि रिचार्ज सुविधा जवळच्या BSNL Retailer किंवा CSC केंद्रांवर उपलब्ध आहे. या केंद्रांवर बिल पेमेंट, सिम इश्यू यांसारख्या सेवाही दिल्या जातात.
याचबरोबर कंपनीने आपला Silver Jubilee FTTH प्लॅन देखील बाजारात आणला असून त्याची किंमत 625 रुपये प्रति महिना आहे. या फायबर प्लॅनमध्ये ग्राहकांना 2500 GB पर्यंत हाय-स्पीड डेटा मिळतो आणि इंटरनेटचा वेग 70 Mbps पर्यंत जातो. प्लॅनमध्ये 600+ लाईव्ह टीव्ही चॅनेल, 127 प्रीमियम चॅनेल तसेच जिओहॉटस्टार आणि सोनीलिव्हचे OTT सब्सक्रिप्शनही मिळते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule