युक्रेन- रशियाकडून कैद्यांच्या देवाणघेवाणीची तयारी सुरु; १,२०० युक्रेनियन सैनिक घरी परतण्याची शक्यता
कीव, 16 नोव्हेंबर (हिं.स.)।रशिया आणि युक्रेन यांच्यातील संघर्षाला तीन वर्षे झाली असतानाही युद्ध थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. रशिया सतत युक्रेनवर हल्ले करत आहे. तथापि या वातावरणात एक सकारात्मक बातमी समोर आली आहे. युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स
युक्रेन- रशियाकडून कैद्यांच्या देवाणघेवाणीची तयारी सुरु; १,२०० युक्रेनियन सैनिक घरी परतण्याची शक्यता


कीव, 16 नोव्हेंबर (हिं.स.)।रशिया आणि युक्रेन यांच्यातील संघर्षाला तीन वर्षे झाली असतानाही युद्ध थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. रशिया सतत युक्रेनवर हल्ले करत आहे. तथापि या वातावरणात एक सकारात्मक बातमी समोर आली आहे. युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी सांगितले की त्यांच्या सरकारकडून रशियासोबत कैद्यांच्या आदान-प्रदानाची प्रक्रिया पुन्हा सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, ज्याचा उद्देश सुमारे 1,200 युक्रेनियन सैनिकांना घरी परत आणणे आहे. त्यांनी सांगितले की या विषयावर अनेक बैठका आणि चर्चा सुरू असून विविध माध्यमांद्वारे संवाद कायम ठेवला जात आहे.

युक्रेनच्या राष्ट्रीय सुरक्षा आणि संरक्षण परिषदेचे सचिव रुस्तेम उमेरोव यांनी सांगितले की तुर्किये आणि संयुक्त अरब अमिरात यांच्या मध्यस्थीने चर्चा झाली, आणि दोन्ही पक्षांनी 2022 मध्ये इस्तंबूलमध्ये ठरवलेल्या कैद्यांच्या अदलाबदलीच्या नियमांवर सहमती दर्शवली आहे. त्यांनी आशा व्यक्त केली की परत येणारे युक्रेनियन सैनिक नववर्ष आणि ख्रिसमस आपल्या कुटुंबासोबत साजरा करू शकतील.

दरम्यान, या घडामोडींमध्येही रशियाचे युक्रेनवरील हल्ले थांबलेले नाहीत. ताज्या माहितीप्रमाणे रशियन ड्रोन हल्ल्यांत ओडेसा प्रदेशातील वीज आणि ऊर्जा-संबंधित पायाभूत सुविधांचे मोठे नुकसान झाले आहे. एक सौर ऊर्जा प्रकल्पही बाधित झाला. हिवाळा जवळ येत असल्याने युक्रेन सततच्या हवाई हल्ल्यांमुळे आणि वीज कपातीमुळे गंभीर अडचणीत आहे.

युक्रेनियन हवाई दलाच्या माहितीनुसार, रशियाने एका रात्रीत 176 ड्रोन आणि एक क्षेपणास्त्र डागले, यापैकी 139 ड्रोन पाडण्यात किंवा निष्प्रभ करण्यात युक्रेनला यश आले.दुसऱ्या बाजूला, रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने दावा केला की त्यांनी 57 युक्रेनियन ड्रोन नष्ट केले. दरम्यान, सध्या युक्रेन आपली सीमारेषा सुरक्षित ठेवण्याचा आणि रशियाच्या पुढे जाण्याच्या प्रयत्नांना रोखण्याचा प्रयत्न करत आहे. यासोबतच कैद्यांना शक्य तितक्या लवकर परत आणून त्यांना आपल्या कुटुंबासोबत सण साजरा करण्याची संधी मिळावी, यावरही सरकार लक्ष केंद्रित करत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande