
बीड, 22 नोव्हेंबर, (हिं.स) धारूर नगरपरिषद निवडणुकीमध्ये अंतिम चित्र स्पष्ट झाले असून, नगराध्यक्ष पदासाठी ५ तर नगरसेवक पदासाठी ८५ उमेदवार रिंगणात राहिले आहेत. प्रारंभी नगराध्यक्षपदासाठी १४ जणांनी दाखल केलेल्या १६ अर्जापैकी ४ अर्ज अवैध ठरले. त्यानंतर माघारीच्या दिवशी अनेकांनी माघार घेतल्याने अखेर ५ उमेदवार रिंगणात उरले असून त्यापैकी १ अपक्ष उमेदवार आहे.
नगरसेवक पदासाठी एकूण १५१ अर्ज दाखल झाले होते. त्यातील ३२ अर्ज अवैध ठरले. उर्वरित १०८ उमेदवारांपैकी २३ जणांनी माघार घेतल्यामुळे अंतिमतः ८५ उमेदवार वीस प्रभागांमधून निवडणुकीत उतरले आहेत. अपक्षांची संख्या पूर्वीच्या तुलनेत कमी होत ८ ते १० च्या आसपास स्थिरावली आहे. धारूरमधील निवडणूक वातावरण अधिकच तापले आहे. चार प्रमुख राजकीय पक्षांमध्ये झालेली सरळ चुरस लक्षवेधी ठरत आहे. भाजप उमेदवार रामचंद्र निर्मळ यांच्या प्रचारासाठी डॉ. स्वरूपसिंह हजारी आणि माधव निर्मळ हे कॉर्नर बैठकींवर भर देत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे उमेदवार बालासाहेब जाधव यांच्या
प्रचारासाठी आमदार प्रकाश सोळंके आणि जयसिंग सोळंके सक्रिय झाले असून त्यांनीही बैठकींची मालिका सुरू केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे उमेदवार अर्जुन गायकवाड यांच्या प्रचारात खासदार बजरंग सोनवणे यांनी प मैदानात उतरत मतदारांशी संवाद सुरू केला आहे. तर शिवसेना (शिंदे गट) चे उमेदवार सुरेश गवळी यांनी 'बदल गट)हवा चेहरा नवा' या ब्रीदवाक्याखाली घरदार संपर्क मोहीम राबवून गाठीभेटींना वेग दिला आहे. धारूर नगरपरिषद निवडणुकीत पक्षीय लढत अधिक तीव्र होत असून भाजप, दोन राष्ट्रवादी गट यांच्यात तगडी चुरस निर्माण झाली आहे. स्थानिक राजकारणात विराजमान झालेल्या या चुरशीमुळे धारूरची निवडणूक रंगतदार बनली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis