
लातूर, 22 नोव्हेंबर (हिं.स.)। अहमदपूर नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोहोचली असून, या लढतीत 'युवा फॅक्टर' गेमचेंजर ठरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रसिद्ध झालेल्या मतदार यादीच्या विश्लेषणानुसार, शहराचे भवितव्य आता तरुणांच्या हाती असून, १८ ते ३५ वयोगटातील तब्बल १७ हजार १३० तरुण मतदार या निवडणुकीचा निकाल फिरवणार आहेत. त्यामुळे प्रस्थापितांसह सर्वच उमेदवारांचे धाबे दणाणले आहेत.
तारुण्य सज्ज, बदलाचे वारे!
शहरातील एकूण ३७ हजार ६९६ मतदारांपैकी ४५.२७ टक्के मतदार हे तरुण आहेत. अहमदपूरमध्ये वाढलेल्या नव्या वसाहती आणि शिक्षणासाठी झालेले स्थलांतर यामुळे तरुण मतदारांचा टक्का लक्षणीय वाढला आहे. ज्या उमेदवाराला ही तरुण फळी साथ देईल, त्याच्या गळ्यात विजयाची माळ पडणार हे आता निश्चित मानले जात आहे.
२ हजार 'नवे शिलेदार' पहिल्यांदाच बजावणार हक्क
विशेष म्हणजे, या निवडणुकीत १८ ते २० वयोगटातील २ हजार ४७ नवमतदार प्रथमच आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. कॉलेज कट्टा आणि सोशल मीडियावर या नवमतदारांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येत आहे. अर्ज भरताना उमेदवारांच्या रॅलीमध्ये दिसलेली तरुणांची गर्दी हेच सांगते की, २ डिसेंबरला होणाऱ्या मतदानात विक्रमी मतदान होणार आहे.
तरुणांचा हा धसका घेत सर्वच राजकीय पक्षांनी आणि अपक्ष उमेदवारांनी आपली प्रचारनीती बदलली आहे.
पारंपारिक भाषणबाजीला फाटा देत उमेदवार आता 'डोअर टू डोअर' जाऊन तरुणांशी संवाद साधत आहेत.
वॉर्डनिहाय कोपरा सभा आणि सोशल मीडिया कॅम्पेनिंगवर भर दिला जात आहे.
उमेदवारांकडून तरुणांच्या प्रश्नांना प्राधान्य दिले जात आहे.
तरुणांना काय हवे?
जातीपातीचे राजकारण बाजूला ठेवून अहमदपूरचा तरुण आता 'विकासा'वर बोलू लागला आहे. त्यांना केवळ आश्वासने नकोत, तर ठोस कृती हवी आहे.
चांगले रस्ते आणि गटारींची व्यवस्था.
शहरात सुसज्ज बालोद्यान आणि फिरण्यासाठी बागा.
खेळाडूंसाठी उत्तम दर्जाचे क्रीडांगण.
हे मुद्दे ज्यांच्या अजेंड्यावर असतील, त्यांच्याच पारड्यात तरुणांचे वजन पडणार आहे. त्यामुळे अहमदपूर नगरपालिकेची ही लढाई आता खऱ्या अर्थाने 'युवा विरुद्ध जुने राजकारण' अशी रंगणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis