विविध योजनांचे देण्यात आलेले उद्दिष्ट बँकांनी वेळेत पूर्ण करावे - हिंगोली जिल्हाधिकारी
हिंगोली, 2 नोव्हेंबर, (हिं.स.)। जिल्ह्यातील सर्व बँकांनी विविध शासकीय योजनांमध्ये देण्यात आलेली उद्दिष्टे वेळेत पूर्ण करणे अत्यावश्यक आहे, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या
जिल्हाधिकारी राहुल गुप्ता


हिंगोली, 2 नोव्हेंबर, (हिं.स.)। जिल्ह्यातील सर्व बँकांनी विविध शासकीय योजनांमध्ये देण्यात आलेली उद्दिष्टे वेळेत पूर्ण करणे अत्यावश्यक आहे, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र कदम, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अनिल कदम, व्यवस्थापक रवींद्र पत्की, कृषी उपसंचालक पी. एस. हजारे, अग्रणी जिल्हा व्यवस्थापक सुजित झोडगे, विविध बँकांचे जिल्हा समन्वयक उपस्थित उपस्थित होते.

बैठकीत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना, प्रधानमंत्री स्वनिधी, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, अटल पेन्शन योजना, जीवन ज्योती विमा योजना, पशुसंवर्धन व मत्स्यव्यवसाय विभागाच्या योजना, किसान क्रेडिट कार्ड, बचतगट कर्ज प्रकरणे आदी योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यात आला. या सर्व योजनांचे उद्दिष्ट तात्काळ पूर्ण करावेत, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

एसबीआयने समाधानकारक काम न केल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी नमूद केले. संबंधित एलडीएमसोबत सोमवार रोजी विशेष बैठक आयोजित करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाच्या प्रस्तावांच्या मंजुरीमध्ये विलंब झाल्यामुळे याबाबत सविस्तर अहवाल मागविण्यात आला. बँक ऑफ इंडिया यांनी 20 नोव्हेंबरपर्यंत मंजूर प्रस्तावांची खातरजमा करून अहवाल सादर करावा, असे निर्देश देण्यात आले. वसमत बँक ऑफ महाराष्ट्र यांनी केलेल्या मंजुरींची पडताळणी करून लेखी अहवाल देण्याचे आदेश देण्यात आले.सर्व प्रलंबित प्रस्ताव तात्काळ मंजूर करून निकाली काढावेत, अशा स्पष्ट सूचना जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी यावेळी दिल्या.

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेंतर्गत बँकनिहाय उपलब्ध प्रस्ताव, मंजुरीची स्थिती, विलंबाची कारणे याबाबत प्रत्येक बँकेने पुढील बैठकीत सविस्तर माहिती सादर करावी.

बँकांकडे अनेक प्रस्ताव असून त्यांची मंजुरी प्रलंबित असल्याचे आढळले. बँका आणि उद्योजक यांची एसओपी तयार करून घ्यावी, तसेच प्रत्यक्ष कामकाजाची यादी तयार करावी. गुरुवारी बँक व्यवस्थापकांची विशेष बैठक घेण्याचे ठरविण्यात आले असून त्यादिवशी नामंजूर व प्रलंबित प्रस्तावांची संपूर्ण माहिती सादर करावी, असे जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी निर्देश दिले.

जिल्ह्यातील सर्व बँकांनी योजनांच्या उद्दिष्ट पूर्तीसाठी अधिक गतीने कार्यवाही करून नागरिकांना वेळेत लाभ मिळेल, याची दक्षता घ्यावी, असे निर्देश दिले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande