

नवी दिल्ली, 5 नोव्हेंबर (हिं.स.)। भारतीय नौदलाच्या जलमापन आणि सर्वेक्षण क्षमतांमध्ये मोठी झेप घेत, सर्वेक्षण नौका (मोठी) [एसव्हीएल] या वर्गातील तिसरी नौका ‘ईक्षक’ आता अधिकृतरीत्या नौदल ताफ्यात समाविष्ट होण्यास सज्ज झाली आहे. तर नौदलाच्या दक्षिण कमानीत (सदर्न नेव्हल कमांड) समाविष्ट होणारी ईक्षक ही पहिलीच तशा प्रकारची नौका आहे. नौदलप्रमुख ऍडमिरल दिनेश त्रिपाठी यांच्या उपस्थितीत ही नौका 6 नोव्हेंबर या दिवशी कोची येथील नौदलाच्या तळावर एका समारंभात औपचारिकरीत्या नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट केली जाणार आहे.
कोलकात्याच्या जीआरएसई अर्थात- गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनीअर्स लि. ने ईक्षक नौकेची निर्मिती केली आहे. ईक्षक, जहाजबांधणी क्षेत्रातील भारताच्या स्वयंपूर्णतेचे व आत्मनिर्भरतेचे एक देदीप्यमान उदाहरण ठरणार आहे. या जहाजात 80% पेक्षा अधिक भाग स्वदेशनिर्मित घटकांनी बनलेला आहे. आत्मनिर्भर भारत अभियानाच्या यशाचेच हे प्रतिबिंब होय. तसेच, जीआरएसई आणि भारतातील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांतील सहयोगात्मक प्रयत्नांचे ते द्योतक आहे.
ईक्षक या शब्दाचा संस्कृतमधील अर्थ होतो- मार्गदर्शक. अचूकता आणि उद्देशविशिष्टता या वैशिष्ट्यांमुळे सदर नौकेसाठी ते चपखल नाव ठरते. बंदरे, जहाज-विरामस्थाने आणि नौदल दिशादर्शक मार्गिका यांच्या किनारी भागात आणि खोल पाण्यात संपूर्ण जलमापन सर्वेक्षणे करण्यासाठी या नौकेची रचना करण्यात आली आहे. यातून मिळणारी माहिती आणि आकडेवारी, समुद्रात दिशादर्शनासाठी आणि सुरक्षिततेसाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. यातून भारताचा सागरी सुरक्षा आराखडा अधिक बळकट होणार आहे.
जलमापन आणि समुद्रमापन शास्त्रांसाठी आवश्यक अशी अत्याधुनिक उपकरणे या नौकेवर बसवण्यात आली आहेत. यांमध्ये उच्च पृथक्करण क्षमतेचा बहु-शलाका प्रतिध्वनी ध्वनिनिर्माता (हाय-रिझॉल्युशन मल्टी-बीम इको साउंडर), स्वायत्त जलमग्न वाहक (ऑटोनॉमस अंडरवॉटर व्हेइकल - एयूव्ही), दूरचालित वाहक (रीमोटली ऑपरेटेड व्हेइकल - आरओव्ही) आणि चार सर्वेक्षण यंत्रनौका (सर्व्हे मोटर बोट्स - एसएमबीएस) समाविष्ट आहेत. या सामग्रीच्या बळावर, ईक्षककडे अतुलनीय कार्यवैविध्य आणि क्षमता आलेल्या असून त्यामुळे नौदलाच्या जलमापनशास्त्रीय क्षमतेत मोठी वाढ होणार आहे. या नौकेवर हेलिकॉप्टरसाठीचा एक मजलाही आहे. यामुळे ईक्षकच्या कामाचा आवाका वाढणार असून, विविध क्षेत्रीय मोहिमांमध्ये ईक्षक काम करू शकणार आहे.
सर्वेक्षणे आणि माहितीचे आरेखन करणाऱ्या सारणीविषयक पायाभूत सुविधा यांमध्ये वाढ करण्याच्या दिशेने भारतीय नौदलाचे सध्या विशेष प्रयत्न सुरु असून, त्या वाटचालीत 'ईक्षक'चे स्थान महत्त्वाचे ठरणार आहे. स्वदेशी सामर्थ्याचे, तंत्रज्ञान उत्कृष्टतेचे आणि सागरी कार्यभारितेचे प्रतीक असणारी ईक्षक नौका, नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट होऊन अज्ञाताचे आरेखन करून, भारताच्या प्रदीर्घ सागरी सीमांचे रक्षण करत राष्ट्रसेवा करण्यास सिद्ध झाली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule